लाईट गेली, शिवसैनिकांचा असाही संताप; महावितरणच्या कार्यालयात दिवसाढवळ्या पेटवल्या मेणबत्त्या
अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलने करुन देखील विद्युत वितरण कंपनीच्या प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही.
धुळे : पावसाळा सुरू होताच वीज वितरण कार्यालयाचं (MSEB) काम अधिक वाढतं. मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाटामुळे घरातील वीजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे, पावसाळ्यातील (Rainy) नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विद्युत पुरवठा अचानकपणे खंडीत झाल्याने सर्वांचीच चांगली तारांबळ उडते. दरम्यान, या काळात एमएसईबी कार्यालयात फोन केला असता फोन न उचलणे, लोकांच्या समस्या न ऐकून घेणे अशाही घटना वारंवार घडत असतात. आता, धुळे (Dhule) शहरातील नागरिकांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी थेट एमएसईबी कार्यालय गाठले. येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चक्क महावितरणच्या कार्यालयात मेणबत्ती पेटवून आंदोलन केले.
धुळे शहरात पावसाळा असो की उन्हाळा वारंवार विद्युत पुरवठा हा खंडित होत असतो, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात. प्रत्यक्षात या संदर्भात अनेक संघटना, अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलने करुन देखील विद्युत वितरण कंपनीच्या प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही. केवळ थातूरमातूर कामे पूर्ण करुन वेळ निभावून घेऊन जाण्याचा प्रकार विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून होत आहे. विद्युत वितरण कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात आज शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक होऊन अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात मेणबत्ती पेटवून अनोख्या पध्दतीने आंदोलन केले.
शिवसेनेच्यावतीने संपूर्ण धुळे शहरातील विद्युत वितरण प्रणालीचा अभ्यास केल्यानंतर काही महत्त्वाच्या बाबी सूचवत, त्यावर त्वरीत योग्य ती अंमलबजावणी करुन धुळे शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत व अखंडित राहिल, यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी शिवसैनिकांच्यावतीने करण्यात आली. तसेच, महावितरण विभागाने पावासाळ्याच्या काळात योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणीही अधीक्षक अभियंता वैरागडे, मचिये व जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. दरम्यान, शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयातून दिवसाढवळ्या मेणबत्ती पेटवून आपला रोष व्यक्त केला.
शिवसैनिकांच्या या हटके आणि संतप्त आंदोलनाची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू असून या आंदोलनाच्या घटनेचे व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे, आता धुळे शहर महावितरण विभाग कार्यतत्परता दाखवतो की, पुन्हा शिवसैनिकांवर आंदोलनाची व नागरिकांवर संतापाची वेळ येते हे लवकरच स्पष्ट होईल.