(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aarey Metro Car Shed : मेट्रोला उशीर म्हणजे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ - देवेंद्र फडणवीस
Mumbai Aarey Metro Car Shed : ही मेट्रो एक एक दिवस उशीर करणे म्हणजे मुंबईकरांचं प्रदुर्षणाच्या माध्यमातून आयुष्य कमी करणे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis : मेट्रोला उशीर म्हणजे मुंबईकरांच्या जीवाशी एकप्रकारे खेळ आहे. ही मेट्रो एक एक दिवस उशीर करणे म्हणजे मुंबईकरांचं प्रदुर्षणाच्या माध्यमातून आयुष्य कमी करणे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही आंदोलन करणं चुकीचं असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. आरे कारशेडच्या निर्णायानंतर होणाऱ्या आंदोलनाच्या प्रश्नावर ते बोलत होते.
आरे येथील मेट्रो कारशेडची जागा पृथ्वीराज सरकारने दिली होती. त्यानंतर आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही त्यासंबंधीत करार केला. टेंडर्स बोलवले. त्यावेळी आमच्याकडे हा प्रकल्प कांजूरला शिफ्ट करण्याची मागणी आली होती. त्यावेळी आम्ही अजय मेहतांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने हे शिफ्ट करणे, योग्य नसल्याचं सांगितलं होतं. तरीही आम्ही कोर्टात गेलो, त्यावेळी कोर्टानं तीन हजार कोटी रुपये भरा मग निकाल देतो, असं सांगितलं. त्यानंतर आरेची जागा आम्ही अंतिम केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार आले, त्यांनी यावर सैनिक समिती नेमली होती. त्या समितीनेही आरेमध्येच कारशेडचा अहवाल दिलाय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ज्या संस्थांनी आरे कारशेडविरोधात आंदोलन केले, ते उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल दिला. ते एंजेटीमध्ये गेले, त्यांनीही त्यांच्याविरोधात निकाल दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात लिहिलेय की, जी झाडे कापली, ती आपल्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन सीक्वेस्ट्रेशन करतील, तेवढं मेट्रो 80 दिवसांत करेल. त्यामुळे दोन लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन मेट्रोमुळे थांबणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कुणीही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायानंतर त्या ठिकाणी काम सुरु झालं होतं. त्यानंतर कुठलेही आंदोलन नव्हतं. 25 टक्के काम पूर्ण झालं. त्यानंतर ते काम थांबवण्यात आले. पर्यावरणवाद्यांचा आम्ही आदर करतो. त्यांनी त्यांचं मत मांडलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही आंदोलन होत असेल तर त्यामागे सरहेतू आहे का? असा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या हितासाठी कारशेडचा निर्णय घेतला आहे. 25 टक्के काम पूर्ण झालेय. 25 टक्के काम वेगानं पूर्ण केले तर दररोज जे मुंबईकर लोकलमधील गर्दीमुळे गुदमरतात त्यांना 40 किमीची लाईफलाईन मिळणार आहे. त्यांच्या जिवनातील प्रवास सुखकर होणार आहे. त्यामुळे हा निर्णय अतिशय योग्य आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.