Maharashtra Weather: पुण्यासह विदर्भ तापला! अकोला, अमरावती, वर्ध्यामध्ये पारा 40 अंशाच्या पार, अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमान, हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट
Maharashtra Weather: राज्यातील इतर भागांतही तापमानात वाढ होताना दिसत आहे. पुणे (लोहगाव) येथे ३८.५ अंश तापमान नोंदवले गेले, तर जळगावमध्येही ३८.५ अंश तापमानाची नोंद झाली.

पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असून विदर्भात तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेची (Maharashtra Weather Update) तीव्रता जाणवू लागली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.(Maharashtra Weather Update)
विदर्भातील अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ अमरावती येथे ४०.६ अंश तर वर्धा जिल्ह्यात ४० अंश तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीलाच विदर्भात उन्हाचा तडाखा वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे.(Maharashtra Weather Update)
राज्यातील इतर भागांतही तापमानात वाढ होताना दिसत आहे. पुणे (लोहगाव) येथे ३८.५ अंश तापमान नोंदवले गेले, तर जळगावमध्येही ३८.५ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूरमध्ये ३९.६ अंश तापमान नोंदवून उष्णतेची तीव्रता जाणवली. सांगलीमध्ये ३८.३, छत्रपती संभाजीनगर येथे ३८.२, परभणी व मालेगाव येथे ३८.१ अंश तापमान नोंदवले गेले. नाशिकमध्ये ३७ अंश तर धाराशिवमध्ये ३७ अंश तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये ३७.८, वाशिममध्ये ३९.२, यवतमाळमध्ये ३८.४ आणि बुलढाण्यात ३७.२ अंश तापमान नोंदवले गेले. दरम्यान, गोंदिया येथे ३६.६ अंश तापमानाची नोंद झाली. कोल्हापूरमध्ये ३०.७ अंश तर महाबळेश्वरमध्ये सुमारे ३० अंशांच्या आसपास तापमान नोंदले गेले.(Maharashtra Weather Update)
दरम्यान, हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि वेगाने वाढणारे शहरीकरण यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून त्याचे परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनीही यंदाचा उन्हाळा आतापर्यंतच्या तुलनेत अधिक उष्ण ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.(Maharashtra Weather Update)
जागतिक हवामान बदल निर्देशांकात भारताचा क्रमांक २३वा असून हवामान धोक्याच्या बाबतीत भारत जगात नवव्या स्थानावर आहे. तसेच २०२५ ते २०२९ हा कालावधी जागतिक तापमानाचे नवे विक्रम प्रस्थापित करणारा ठरू शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. जानेवारी अखेर आणि मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेने उच्चांक गाठण्यास सुरुवात केल्याने यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (कमाल तापमान)
पुणे (लोहगाव): ३८.५
जळगाव: ३८.५
कोल्हापूर: ३०.७
महाबळेश्वर: ३००.७
मालेगाव: ३८.१
नाशिक: ३७
सांगली: ३८.३
सोलापूर: ३९.६
छत्रपती संभाजीनगर: ३८.२
परभणी: ३८.१
धाराशिव: ३७
अकोला: ४०.८
अमरावती: ४०.६
बुलढाणा: ३७.२
गोंदिया: ३६.६
नागपूर: ३७.८
वाशिम: ३९.२
वर्धा: ४०
यवतमाळ: ३८.४
महत्त्वाच्या बातम्या





















