Devendra Fadnavis on Seat Sharing : अजित पवार जे बोलले तेच देवेंद्र फडणवीस नागपुरात बोलले! महायुतीची चर्चा किती टक्क्यात अडली?
भाजपने शिवसेनेने 2019 मध्ये लढवलेल्या जागांवरती उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यामुळे या जागा कोणाच्या वाट्याला जाणार याची चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी भाष्य केले.
नागपूर : भाजपचा महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुरू असतानाच भाजपकडूनदुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 जागांची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं दुसऱ्या यादीत आलं असून पंकजा मुंडे, सुधीर मनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना सुद्धा मुंबईतून संधी देण्यात आली आहे. भाजपच्या राज्यातील पहिल्या यादीमध्ये पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदे गटातील ज्यांच्या विरोधात सर्व्हे गेले आहेत त्यांना आता उमेदवारी मिळणार की नाही? चर्चा रंगली आहे.
महायुतीच्या जागावाटपामध्ये 80 टक्के काम पूर्ण
भाजपने शिवसेनेने 2019 मध्ये लढवलेल्या जागांवरती उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यामुळे या जागा कोणाच्या वाट्याला जाणार याची चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आज (14 मार्च) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपावर महत्त्वपूर्ण भाष्य केले. तसेच मनसेची सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, तिन्ही पक्षांची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. ही चर्चा लवकर पूर्ण होईल असा मला वाटतं. महायुतीच्या जागावाटपामध्ये 80 टक्के काम पूर्ण झाला असून 20 टक्के काम राहिलं आहे ते आम्ही लवकरच पूर्ण करू असा दावा त्यांनी केला. मनसेला महायुतीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. मुंबईमधील दोन जागा त्यांना देण्यात येऊ शकतात, अशीही चर्चा आहे. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणीस यांनी अधिक भाष्य केलं नाही.
फडणवीस यांनी सांगितले की, चर्चा खूपच होत असते पण निर्णय झाला तर आम्ही तुम्हाला सांगू, इतकीच माफक प्रतिक्रिया दिली. महायुती जागावाटपावर विलंब होत आहे का? असे विचारण्यात आले असता देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपात कोणताही उशीर झाला नसल्याचे म्हणाले. महायुतीचे सर्व उमेदवार लवकरच जाहीर केले जातील. मनसेबाबततुम्हाला जेवढ्या चर्चा करायच्या तेवढ्या करा आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊन तुम्हाला माहिती देऊ, असं त्यांनी सांगितले.
20 टक्के जागांची निश्चिती पुढील बैठकीत होईल
तत्पूर्वी, बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी तोच दावा केला होता. महायुतीच्या जागावाटपाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 20 टक्के जागांची निश्चिती पुढील बैठकीत होईल, असे त्यांनी म्हटले होते. भाजपला ज्या जागा द्यायच्या ठरल्या होत्या त्या जागा त्यांनी जाहीर केल्याचे अजित पवार म्हणाले.
विजय शिवतारेंवर काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले की, शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची बातमी मी पाहिली असून आमचे काही सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलले असून मी सुद्धा बोललो आहे. महायुतीत एकोपा ठेवण्याची नितांत गरज आहे, विधाने करताना महायुतीला त्रास होणार नाही, भावना दुखावल्या जाणार नाहीत, असा प्रयत्न सर्वांनी करायला हवा, असे त्यांनी नमूद केले.