बुलडाण्यातील जामोदमध्ये विहिरीत अडकलेल्या दोघांचा गुदमरुन मृत्यू
दोघेही तब्बल 12 तासांहून अधिक वेळ विहिरीत अडकून होते. अकोला येथील संत गाडगेबाब आपतकालीन पथकाने रात्री 11.30 च्या सुमारास दोघांना विहिरीतून बाहेर काढले.

बुलडाणा : अंगणातील विहिरीत खोदकामासाठी उतरलेल्या दोघांचा गुदमरून मृत्यू घटना बुलडाण्याच्या जामोद येथे घडली आहे. तर एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय वाघमारे आणि मिलिंद वाघमारे यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
जामोद येथे वाघमारे यांच्या घरासमोरील विहिरीचे खोदकाम सुरु होते. सुरुवातीला प्रतिक वाघमारे हा विहिरीत उतरला होता. त्याचा जीव गुदमरल्याने त्याने आवाज दिला. तेव्हा त्याचे काका विजय वाघमारे हे विहिरीत उतरले. मात्र दोघेही बाहेर आले नाही. त्या दोघांना काढण्यासाठी मिलिंद वाघमारे हे खाली उतरले. त्यांनी प्रतिक वाघमारेला दोराने बांधून वर काढले. त्यानंतर ते विजय वाघमारे यांना काढायला विहिरीत उतरले. मात्र विजय व मिलिंद वाघमारे विहिरीतच अडकून राहिले.
दोघेही तब्बल 12 तासांहून अधिक वेळ विहिरीत अडकून होते. अकोला येथील संत गाडगेबाब आपतकालीन पथकाने रात्री 11.30 च्या सुमारास दोघांना विहिरीतून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विजय आणि मिलिंद वाघमारे यांचा मृत्यू झाला असून प्रतिक वाघमारे याच्यावर जामोदमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दुपारी घटना घडल्यानंतर प्रथम स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आली होती, मात्र रात्री 8 वाजेपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळाली नाही






















