Dada Bhuse : अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत, आरोप सिद्ध न झाल्यास मानहानीचा दावा करणार; दादा भुसेंचा इशारा
Dada Bhuse On Sushma Andhare : यासंबंधित चौकशी केल्यानतंर सत्य समोर येईल, सुषमा अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत असं राज्याचे मंत्री दादा भुसे म्हणाले.
मुंबई: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीच्या आधारे आपल्यावर आरोप केले आहेत, त्यामध्ये तथ्य नसल्याचा दावा राज्याचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला. तसेच चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचंही दादा भुसे म्हणाले. ड्रग्ज माफिया ललित पाटील यांना ससूनमध्ये (Sasoon Drugs Case) दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी कॉल केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली.
पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयामध्येच उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. त्यानंतर या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. पहिल्यांदा पुण्याचे आमदार रविंद्र धनगेकर यांनी शिंदे गटाच्या एका मंत्र्यांने ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्यावरच आरोप करत त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी केली होती.
Dada Bhuse On Sushma Andhare : तर मानहानीचा दावा दाखल करणार
सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मंत्री दादा भुसे म्हणाले की, "सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीवर हा आरोप केला आहे. सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीवर आरोप केले. त्यांच्याकडे पुरावे किंवा ठोस माहिती नाही, सुषमा अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत. माझे कॉल रेकॉर्ड चेक करावेत, त्यासंबंधित सर्वांचे कॉल रेकॉर्डे चेक करावेत. असे आरोप करणे म्हणजे एखाद्याला आयुष्यातून उठवण्यासारखं आहे. चौकशीमध्ये सत्य समोर येईल आणि नंतर आरोप करणाऱ्यांना माफी मागावी लागेल. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध न झाल्यास मानहानीचा दावा दाखल करणार."
दादा भुसेंना बदनाम करण्याचा डाव
राज्याचे मंत्री दादा भुसे हे कार्यक्षम मंत्री असून त्यांना बदनाम करण्याचा डाव विरोधकांनी रचला असल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. आरोप कुणी कुणावर करावेत याला बंधन नाही असंही ते म्हणाले.
ही बातमी वाचा: