(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyclone Nisarga LIVE UPDATE | राज्यात आज 2560 नवे कोरोनाबाधित, 122 जणांचा मृत्यू
Cyclone Nisarga LIVE UPDATE : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करत आहे. हे वादळ आज (3 जून) अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. या वादळाचा फटका अलिबाग, रत्नागिरी, पालघरसह मुंबईलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. या चक्रीवादळाच्या काळात प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावे. खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी स्थलातंरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं.
LIVE
Background
Cyclone Nisarga LIVE UPDATE : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करत आहे. हे वादळ आज (3 जून) अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि दीव-दमण, गुजरात परिसरात ताशी 120 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. रायगडच्या किनारपट्टी भागातून 40 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, एनडीआरएफ आणि इतर सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुंबई ते सिंधुदुर्ग पट्ट्यातील सर्वच नागरिकांनी या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे गरजेचं आहे. या चक्रीवादळाचा वेग अंदाजे सव्वाशे किलोमीटर असण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.या चक्रीवादळाच्या काळात प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावे. खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी स्थलातंरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तयारी केली आहे. त्याचबरोबर मुंबईतील सर्व यंत्रणांना मुंबई महापालिकेकडून सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ आज पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळाचा धोका असल्याने आता कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून देखील काळजी घेतली जात आहे. ज्या बोटी अद्याप देखील समुद्रात आहेत त्यांना माघारी किनाऱ्यावर बोलवण्यात आले आहे. शिवाय, 26 जणांची एनडीआरएफ टीम दाखल झाली असून हे सर्वजण चिपळूण येथे आहेत. किनारी भागात सध्या सतर्क राहा असे आदेश देखील देण्यात आले आहेत. कोस्ट गार्ड देखील सध्या याबाबत काळजी घेताना दिसत आहे.
राज्य सरकारची तयारी
चक्रीवादळबाबत राज्य सरकारने तयारी केली आहे. चक्रीवादळाचा फटका ज्या जिल्ह्यात बसू शकतो त्या जिल्ह्यात एक एनडीआरएफ (NDRF) टीम बोलवण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात एनडीआरएफ टीम पोहचल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रात गेलेल्या बोटींना परत बोलवण्यात आल्या आहेत. पुढची सूचना येईपर्यंत बोटी समुद्रात जाऊ शकणार नाही. नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवब्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
पालघर जिल्ह्याला चक्रीवादळाचा धोका!
अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवदळाचा परिणाम म्हणून पुढील काही दिवस पालघर, ठाणे, मुंबई रत्नागिरी, रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात आज एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. तर सध्या स्थानिक प्रशासनाच्या मदतीने समुद्र काठच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. एनडीआरएफ प्रमुख बी शिवप्रसाद राव हे आपल्या तुकडीसह सध्या पाहणी करत आहेत. तर तटरक्षक दल, मेरीटाईम बोर्ड प्रशासन सज्ज झालंय.
अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळाचं नाव कुणी दिलं?
- अरबी समुद्रात तयार होणाऱ्या आगामी चक्रीवादळाचे नाव निसर्ग असे आहे. हे नाव बांगलादेशने सुचवले आहे.
- उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती.
- नव्या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या 13 देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी 13 अशा एकूण 169 नावांचा समावेश करण्यात आला आहे.
- अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील नावे चक्रीवादळांना देण्यात येणार आहेत.