Coronavirus : तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सर्व तयारी पूर्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा विश्वास
राज्यात लसीच्या तुटवड्यामुळे 18 ते 44 वयाच्या नागरिकाचे लसीकरण लांबणीवर पडल्याचं चित्र आहे, अशावेळी आता लस आयात करण्यावर लक्ष देत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
जालना : तिसऱ्या लाटेची 100 टक्के शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे, मात्र याला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, लहान मुलांना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकार पूर्ण सज्ज असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात सोमवारपासून होणाऱ्या अनलॉकवर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे. बऱ्याच दिवसाने होणाऱ्या अनलॉकमुळे संभाव्य गर्दी लक्षात घेता नागरिकांनी कोरोनाविषयक नियम गांभीर्याने पाळावेत असं यावेळी ते म्हणाले.
राज्यात लसीच्या तुटवड्यामुळे 18 ते 44 वयाच्या नागरिकाचे लसीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना या संदर्भात विचारलं असता राज्याने सर्व प्रयत्न करुन देखील लस उपलब्ध होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय. त्यामुळे लस आयात करण्यावरच आम्ही अधिक लक्ष देऊन असल्याचं देखील टोपे म्हणाले.
कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नसल्याने पाच वेगवेगळे स्तर ठरवण्यात आले आहेत. हे स्तर निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेडसची दैनदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात येणार आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेणार आहेत. कुणीही गोंधळू नये व इतरांना गोंधळवू नये असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील पाच जिल्ह्यामध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारच्या खाली खाली आहे. यामध्ये नंदुरबार, बुलडाणा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील 13 महानगगरपालिका क्षेत्रात आणि 8 जिल्ह्यामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maratha Reservation : मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, 16 जूनपासून आंदोलनाला सुरुवात; संभाजीराजेंचा इशारा
- Shivrajyabhishek Din 2021 : राजा कसा असावा, रयतेचे काम कसे करावे हे आपल्या पहिल्या राजाने दाखवून दिलं : अजित पवार
- Dilip Kumar : प्रकृती अस्वास्थामुळे बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल