कोरोनाचा परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर, आयआयटी मुंबईचा चिंताजनक दावा
कोरोनाचा (Corona) परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो, असा दावा आयआयटी मुंबईने केला आहे.

Corona : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोना महामारीचे संकट आहे. फेब्रुवारीपासून कोरोनातून थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंधही कमी करण्यात आले आहेत. त्यातच आता कोरोनासंदर्भात एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या सौम्य किंवा मध्यम संसर्गमुळे देखील पुरुषांच्या प्रजनन प्रणालीशी संबंधित प्रथिनांच्या पातळीत बदल होऊ शकतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.
एसीएस ओमेगा या जर्नलमध्ये गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या संशोधनात कोरोनामधून बरे झालेल्या पुरुषांच्या वीर्यातील प्रथिनाच्या पातळीचे विश्लेषण करण्यात आले. एसीएस ओमेगामध्ये प्रकाशित झालेल्या जर्नलमधील संशोधनानुसार, SARS-CoV-2 या विषाणूमुळे कोरोना होतो. हा विषाणू श्वासन यंत्रणेवर परिणाम करतो. परंतु हा विषाणू आणि या विषाणूसाठी शरीराकडून देण्यात येणाऱ्या प्रतिसादामुळे इतर ऊतींना देखील नुकसान पोहोचू शकते.
"कोरोनाचा विषाणू पुरुषांची प्रजनन क्षमता कमी करू शकतो. शिवाय हा विषाणू पुरुषांच्या पुनरुत्पादक अवयवांमध्ये देखील आढळला आहे, असे या जर्नलमधील संशोधनात म्हटले आहे.
या संशोधनात मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संशोधकांनीही सहभाग घेतला आहे. कोरोनाचा पुरूष प्रजनन प्रणालीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो का? हे या संशोधकांच्या टीमला शोधायचे होते. त्यासाठी या टीमने दहा निरोगी पुरुषांच्या वीर्यामधील प्रथिनाची पातळी आणि अलीकडेच कोरोनाच्या सौम्य किंवा मध्यम संसर्गातून बरे झालेल्या 17 पुरुषांच्या वीर्यामधील प्रथिनाच्या पातळीची तुलना केली. संशोधनासाठी निवड करण्यात आलेले सर्व पुरुष 20 ते 45 वयोगटातील होते. त्यांच्यापैकी कोणालाही प्रजननक्षमतेच्या कमतरतेच्या समस्येने यापूर्वी ग्रासले नव्हते.
संशोधनानंतर संशोधकांना असे आढळून आले की, कोरोनाचा संसर्ग झाला नसलेल्या पुरूषांच्या तुलनेत कोरोनामधून बरे झालेल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या खूप कमी आढळली आहे. यासोबतच कोरोनातून बरे झालेल्या पुरुषांच्या वीर्यातील प्रथिनांच्या पातळीतही बदल झाल्याचे संशोधनातून आढळून आले आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या























