(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra SRPF : अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी आईऐवजी मुलाला ग्राह्य धरा; राज्य राखीव पोलीस दलाला मॅटचे आदेश
आई मंदा यांनी वयाचे 45 वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे मुलाने मॅटमध्ये धाव घेतली. त्यावर आदेश देण्यात आले.
Nagpur News : आईला 45 वर्षे पूर्ण झाल्यामुळे अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यास नकार देणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाला (state reserve police force) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) (Maharashtra Administrative Tribunal) अनुकंपा यादीत आईऐवजी मुलाचे नाव समाविष्ट करून शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी देण्याचे आदेश दिले आहेत. लिकेश भागवत बांद्रे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. त्यांचे वडील भागवत बालकृष्ण बांद्रे हे एसआरपीएफमध्ये कार्यरत होते. दरम्यान 23 जानेवारी 2008 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी मंदा भागवत बांद्रे यांनी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला. 2013 मध्ये मंदा यांनी एसआरपीएफकडे (SRPF) अर्ज करून त्यांचा मुलगा लिकेश याला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी, असा दुसरा अर्ज केला. या अर्जावर एसआरपीएफने (SRPF) कोणताही निर्णय घेतला नाही.
15 मार्च 2022 ला मंदा बांद्रे यांना वयाचे 45 वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे लिकेश यांनी ॲड. नाझिया पठाण व ॲड. मंगेश राऊत यांच्यावतीने मॅटमध्ये धाव घेतली. या याचिकेवर न्या. मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर मॅटने (MAT) एसआरपीएफ कमांडंटचा 15 मार्च 2022 चा आदेश रद्द करून याचिकाकर्त्याचे नाव अनुकंपा यादीत समाविष्ट करावे व नियमानुसार नोकरी देण्याचे आदेश दिले.
अनेक प्रकरणांमध्ये आदेश उपायुक्त
राज्यभरात अशा प्रकारची अनेक प्रकरण प्रलंबित असतात. त्यामुळे मॅटने दिलेल्या या आदेशामुळे अनेक प्रकरणांत या आदेशाचा संदर्भ घेऊन अनेकांना न्याय मिळू शकतो. तसेच या संदर्भात अर्ज आल्यास निर्णय घेण्यास प्रशासकीय यंत्रणेलाही मदत होणार आहे, असं बोललं जात आहे.
एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनाही मिळाला होता 'मॅट' कडून दिलासा
गेल्यावर्षी मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दया नायक यांच्या नावाचा सुद्धा समावेश होता. दया नायक यांची गोंदियामध्ये बदली करण्यात आली होती. मात्र याविरोधात दया नायक यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर मॅट कोर्टाकडून दया नाईक यांना देखील दिलासा मिळाला होता. त्यांच्या बदलीवर कोर्टाने स्थगिती दिली होती.
ही बातमी देखील वाचा