कोरोनाचं पॅकेज 'सिरियल' नाही; ‘प्रोमो’ पंतप्रधान दाखवणार आणि अर्थमंत्र्यांनी रोज ‘एपिसोड’ सादर करावा : अशोक चव्हाण
पॅकेज म्हणजे अर्थसंकल्पात करावयाच्या घोषणा नव्हेत. आजच्या घोषणांमध्ये बहुतांश घोषणा पायाभूत सुविधांशी निगडित भविष्यकालीन व दीर्घकाळाच्या उपाययोजना आहेत. अशा घोषणा साधारणतः अर्थसंकल्पात केल्या जातात, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
मुंबई : कोरोनासारख्या जागतिक आपत्तीच्या काळातील मदत पॅकेज कसे असते ते केंद्र सरकारने समजून घेतले पाहिजे. अशा पॅकेजमध्ये तातडीची व भरीव मदत तसेच तत्कालीन उपाययोजनांवर भर असला पाहिजे. अर्थसंकल्पात जाहीर करावयाचे दीर्घकालीन उपाय म्हणजे पॅकेज असू शकत नाही, या शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. कोरोनाचे पॅकेज म्हणजे टीव्हीवरील ‘सिरियल’ नाही की जिचा ‘प्रोमो’ पंतप्रधानांनी दाखवावा आणि अर्थमंत्र्यांनी रोज एक ‘एपिसोड’ सादर करावा, या अशोक चव्हाण यांनी आपला संताप व्यक्त केला.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी घोषित केलेल्या कोरोनासंदर्भातील पॅकेजच्या तरतुदींवर त्यांनी जोरदार तोफ डागली. शेतकऱ्य़ांसाठी जाहीर झालेल्या आजच्या पॅकेजमध्ये थेट मदत म्हणून शेतकऱ्यांना साधा रूपयाही मिळालेला नाही. आजच्या घोषणांमध्ये बहुतांश घोषणा पायाभूत सुविधांशी निगडित भविष्यकालीन व दीर्घकाळाच्या उपाययोजना आहेत. अशा घोषणा साधारणतः अर्थसंकल्पात केल्या जातात, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य; केंद्र सरकारकडून कृषीक्षेत्रासाठी 11 मोठ्या घोषणा
कोरोनावरील पॅकेज जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या पद्धतीवरही त्यांनी टिकेची झोड उठवली. केंद्र सरकारला ज्या घोषणा करायच्या आहेत, त्या एकाच दिवशी करणे सहज शक्य आहे. मात्र, 20 लाख कोटी रूपयांच्या तथाकथित पॅकेजची घोषणा पंतप्रधानांनी करायची आणि त्यातील तरतुदींची माहिती अर्थमंत्र्यांनी दररोज पत्रकार परिषदेत जाहीर करायची, हा प्रकार आश्चर्यकारक असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
VIDEO | Agriculture | शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य, कृषीक्षेत्रासाठी केंद्र सरकारच्या 11 मोठ्या घोषणा