राज्यात थंडीचा कडाका वाढला, काही दिवसांत तापमानात घट होणार
उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 10 अंशांनी खाली आले आहे.
मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चांगलाच घसरत असल्याच चित्र पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान पोहोचले आहे.
नाशिक- निफाड नाशिकसह निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून निफाडला 6 तर नाशिकमध्ये 9.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली गेली आहे. गुलाबी थंडी आता कडाक्याची जाणवू लागल्याने उबदार कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडणं नाशिककरांना अवघड झाले आहे.
परभणी परभणी जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे.आज तापमान हे घसरून 8.7 अंशावर गेले आहे.त्यामुळे सर्वत्र कमालीचा गारवा निर्माण झालाय .शाळेत जाणारे विद्यार्थी कुडकुडत शाळेत जाताना पहायला मिळत आहेत तर पुन्हा एकदा गरम कपडे आणि शेकोटीचा आधार या थंडीपासून बचावासाठी केला जातोय. पुढचे काही दिवस तापमान हे घसरलेलेच राहणार असल्याचा अंदाज ही हवामान विभागाने दिला आहे.
धुळे धुळे शहरासह जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून थंडी मध्ये कमालीची वाढ झाली असून जिल्ह्यातील तापमान सात ते आठ अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचले आहे. शहरासह परिसरात पसरली धुक्याची चादर टपरीवरचा वाफाळलेला चहा आणि नागरिकांची झालेली वर्दळ असे दृश्य सध्या धुळे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
सातारा सातारा जिल्ह्यात तापामान 11 अंश सेल्सीअस आहे तर महाबळेश्वर 9 अंश से. वेण्णालेक 7 अंश से., वाई 8 अंश से, कराड 13 अंश से तापमान आहे.