"फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणलाच पाहिजे", अनाधिकृत फेरीवाल्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा
राज्यात आरोग्य केंद्राची आवश्यकता जास्त आहे की ती सोडून त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू, असा टोला मंदिराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला.
मुंबई : स्काय वॉक फेरीवालामुक्त हे फार महत्त्वाचे आहे. मधल्या काळात ठाण्यामध्ये जी काही घटना घडली, ती पाहिल्यानंतर काही ठिकाणी येत्या काळात आपल्याला अत्यंत कठोरपणे कायदा राबवावा लागेल. फक्त ठाण्यात नाही तर इतर ठिकाणी जिथे जिथे फेरीवाल्यांचा उच्छाद असेल तो आपल्याला आटोक्यात आणावाच लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनाधिकृत फेरीवाल्यांना दिला आहे. कल्याण डोंबिवलीतील कोपर उड्डाणपुलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, स्काय वॉक फेरीवालामुक्त हे फार महत्त्वाचे आहे. मधल्या काळात ठाण्यामध्ये जी काही घटना घडली, ती पाहिल्यानंतर काही ठिकाणी येत्या काळात आपल्याला अत्यंत कठोरपणे कायदा राबवावा लागणार आहे. तिथे दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही. नागरिक, माता भगिनी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे. त्याबाबतीत कुठेही हयगय चालणार नाही. स्कायवॉकच नव्हे तर इतर ठिकाणी जिथे जिथे फेरीवाल्यांचा उच्छाद असेल. तो उच्छाद आपल्याला आटोक्यात आणावाच लागेल. त्या दिशेने काम हे आपल्याला करावं लागेल.
"तु्म्ही काळजी घ्या, फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू" फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी कल्पिता पिंपळेंची राज ठाकरेंनी घेतली भेट
आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरे उघडू का?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंदिर जरी बंद असले तरी आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. आरोग्य केंद्राची आवश्यकता जास्त आहे की ती सोडून त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू. आज आरोग्याची मंदिरे ही महत्त्वाची आहेत. मंदिरही टप्पाटप्प्याने उघडणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा आम्हीही दिल्या आहेत. घोषणेच्या पुढे जात आम्ही हिंदुत्वाचं रक्षण करणारी शिवसेना आहे. हे 92-93 साली दाखवून दिलेलं आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला .