नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांसोबत शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडलं होतं. याप्रकरणी अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

रत्नागिरी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरी विरोधात आंदोलनात करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. काल आरे येथील जंगल वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
नाणार येथे केंद्रातील भाजप सरकार रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होता. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांसोबत शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडलं होतं. नाणार परिसरात सुरु झालेला हा लढा शिवसेनेने मु्ंबईत विधानभवनातून थेट दिल्लीपर्यंत नेत संसदेतही रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार येथे येऊन स्थानिक ग्रामस्थांना प्रकल्प रद्द करु, असा शब्द दिला होता. लोकसभा निवडणूकीपूर्वीच हा प्रकल्प रद्द करत उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेत जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे. आरे येथील कारशेडला विरोध करत जंगल वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेतले त्यापाठोपाठ कोकणचे पर्यावरण आणि निसर्ग सौंदर्य राखण्यासाठी नाणार येथील रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणारवासियांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णायाचे नाणारवासियांनी स्वागत केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज






















