मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाजपेयींचा विसर?
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाजपेयींचा विसर पडला का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरून अभिवादनाचा फोटो किंवा ट्विट केलं नाही.
मुंबई : दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही. त्यावरून भाजप आक्रमक झाली आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला घेरलंय.
काल देशभर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच निमित्ताने नऊ कोटी शेतकऱ्यांना 18 हजार कोटी निधी वितरित केला. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाजपेयींचा विसर पडला का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरून अभिवादनाचा फोटो किंवा ट्विट केलं नाही. हाच मुद्दा पकडून भाजपनं उद्धव ठाकरे यांना सुनावलंय.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे विस्मरण काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना झाले. सत्तेसाठी अशा अनेक गोष्टी सोईस्करपणे विस्मृतीत टाकल्या जात आहेत. अटलजींच्या शब्दात सांगायचे तर "छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता"
या पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करतानाचे फोटो शेअर करण्यात आले होते. विशेष म्हणजे काल नाताळनिमित्त मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवरून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. मात्र वाजपेयी यांच्या जयंतीचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यालयानं केला नाही.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जवळचे संबंध होते. वाजपेयी यापूर्वी मातोश्रीवरही येऊन गेलेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचाही त्यांच्याशी संबंध आला. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंना वाजपेयी यांच्या जयंतीचा विसर पडला की बदलत्या राजकीय मित्रांमुळे मुद्दाहून मुख्यमंत्री कार्यालयानं वाजपेयींबद्दल ट्विट केलं नाही याची चर्चा सुरू झाली.