(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या वादात उतरलं 'भूत'! यशोमती ठाकूर यांनी भुतावरुन केलेल्या टिकेला बच्चू कडूंचं उत्तर
संग्रामपूर नगर पंचायत बुलढाणा जिल्ह्यातील मात्र अमरावती जिल्ह्यातील मंत्र्यांनी गाजवली. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद पुन्हा समोर आलाय.
बुलढाणा : अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि अमरावतीतीलच राज्य मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील राजकीय वाद, आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत. दोघेही महाविकास आघाडीतील मंत्री आहेत मात्र दोघांमधील वाद जगजाहीर आहेत. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या वेळी तर हा वाद विकोपाला गेला होता. यावेळी मोठे आरोप प्रत्यारोप होऊन अमरावतीत तणाव निर्माण झाला होता. आता बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांच्यात नवे आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहे.
राज्यात संग्रामपूर नगर पंचायत निवडणूक गाजली ती बच्चू कडू यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील एन्ट्रीमुळे. बुलढान्यातील संग्रामपूर नगर पंचायत निवडणुकीत बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या 17 उमेदवारांना उभे केले आणि दिगगजांच्या भुवया उंचावल्या. या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या स्टार मंत्री यशोमती ठाकूर यांची संग्रामपूर येथे एकाच दिवशी प्रचार सभा झाल्या. सकाळी यशोमती ठाकूर यांची तर सायंकाळी बच्चू कडू यांची. यशोमती ताईंनी आपल्या प्रचार सभेत बच्चू कडू यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, "आज आमच्या जिल्ह्यातील भूत या ठिकाणी येणार आहे...!". मग काय सायंकाळी बच्चू कडू यांनी आपल्या प्रचारसभेत या टीकेला उत्तर देताना म्हटलं की , "मी साधं सुध भूत नसून पंचमहाभूतातील एक भूत आहे, जे विकासाचं भूत आहे..!"
आता निवडणूक झाल्यावर बच्चू कडू यांना या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळाली. आज बच्चू कडू यांनी यशोमती ठाकूर यांच्या टीकेला ट्वीट करून उत्तर दिलेलं आहे. बच्चू कडू यांनी ट्वीट करून म्हटलंय की, "भूत" लागल्या प्रमाणे विकास करावा हे आता आम्ही दाखवून देऊ. निवडणूकीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले, जनतेने अनेक दिग्गजांना नाकारुन आम्हाला संधी दिल्या बद्दल धन्यवाद, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
निवडणूकीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले, जनतेने अनेक दिग्गजांना नाकारुन आम्हाला संधी दिल्या बद्दल धन्यवाद!
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) January 19, 2022
"भुत" लागल्या प्रमाणे विकास करावा हे आता आम्ही दाखवु
जय प्रहार pic.twitter.com/kxBtAxqlu5
संग्रामपूर नगर पंचायत बुलढाणा जिल्ह्यातील आहे मात्र अमरावती जिल्ह्यातील मंत्र्यांनी गाजवलेली दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या