(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजू शेट्टींना काय वाटतं महत्वाचं नाही, आमचा नेता हा शेतकरी, बुलढाणा लोकसभा लढवणारचं : रविकांत तुपकर
राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी काय वाटतं ते महत्वाचं नाही. कारण माझा नेता हा गावगाड्यातील शेतकरी (Farmers) असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केलं.
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी काय वाटतं ते महत्वाचं नाही. कारण मी जरी स्वाभिमानी संघटनेत असलो तरी माझा नेता हा गावगाड्यातील शेतकरी (Farmers) असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केलं आहे. मी बुलढाणा लोकसभा निववडूक लढवणार आणि जिंकून येणार असल्याचा विश्वास तुपकरांनी व्यक्त केला. ते लातूरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाबाबत प्रश्न विचारला असता ते बोलत होते. 18 जानेवारीपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा मुंबई दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखू असा इशारा तुपकरांनी दिला आहे.
...तोपर्यंत ठीक ठिकाणी आंदोलन सुरुच राहणार
हे सरकार गावगाडा उध्वस्त करणारे आहे. शेतकरी हिताचा निर्णय जोपर्यंत सरकार घेणार नाही तोपर्यंत ठीक ठिकाणी आमचा आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. येत्या काळामध्ये राज्यातील रेल रोको करायचा आमचा निर्णय आहे. नेत्यांना गावबंदी करण्यात येणार असल्याचा इशारा लातूर जिल्ह्यातील औसा येथे पार पडलेल्या शेतकरी आणि निराधार महिला मोर्चामध्ये रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
सरकारला शेती आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य राहिले नाही
आज औसा येथे शेतकरी महामोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चासाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी औसा इथे हजेरी लावली होती. मागील अनेक दिवसापासून शेतकरी हिताचे निर्णय होताना दिसत नाहीत. सरकारला शेती आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य राहिले नाही. यामुळे गावगाडा उध्वस्त होत आहे. शेतमालाला भाव नाही. सोयाबीन आणि कापसाचा दरावरून आपणास हे लक्षात येईल. पाण्याचा आणि विजेचा प्रश्न गंभीर आहे. विम्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. जो विमा मंजूर झालाय तो अत्यल्प आणि तुटपंजा आहे. आमच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला तरच शेतकरी सक्षम होईल असे तुपकर म्हणाले.
लवकरात लवकर शेतकरी हिताचे निर्णय नाही घेतले तर राज्यभरात शेतकरी आक्रमक होणार आहे. 18 जानेवारीपर्यंत सरकारनं निर्णय नाही घेतला तर मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या राज्यातल्या सर्व रेल्वे आम्ही रोखून ठेवणार आहोत. याशिवाय शेतकऱ्यांकडे आता दुसरा पर्याय राहिला नाही. याची सरकारला जाणीव व्हावी म्हणून आंदोलन तीव्र होणार असल्याचे तुपकर म्हणाले.
सरकारचा डोळा मतदारावर...
शेतकरी प्रश्नावर सातत्याने सरकार गोड बोलत असते. मात्र, निर्णय घेण्याच्या वेळेस सरकार मतदार आणि ग्राहकांचा विचार करते. शेतमाल उत्पादक शेतकरी मेला तरी चालेल मात्र मतदार आणि ग्राहक जगला पाहिजे हे सरकारचे धोरण आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतमाला भाव मिळत नाही. संपूर्ण राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी आणि विविध संघटनांना एकत्र घेत याच विषयाच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात येणार आहे. 18 जानेवारी ही अंतिम तारीख असेल. अशी माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
आमचा नेता शेतकरी...
मागील एक महिन्यापासून औसा येथे महामोर्चाचा आयोजन सुरू आहे. आज मोर्चाही घेण्यात आला. मात्र राजू शेट्टी लातूर जिल्ह्यात असून मोर्चाला आले नाहीत. याबाबत रविकांत तुपकर यांना विचारले असता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य शेतकरी हा आमचा नेता आहे. राजू शेट्टींबाबत मला माहित नाही. ते मोर्चाला का आले नाहीत हे त्यांनाच विचारा. संघटनेतील कार्यकर्ते आणि शेतकरी माझ्याबरोबर आहेत असे तुपकर म्हणाले.
लोकसभा लढवणारच....
प्रत्येक वेळी राजू शेट्टी हे लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढणार असे घोषित करतात. मात्र ऐनवेळी कोणाबरोबर तरी युती करून एक दोन जागेवर तडजोड करतात. माझ्या कार्यकर्त्यांना आणि मतदारसंघातील लोकांना मी काय सांगावे असा प्रश्न माझ्यासमोर पडतो. मात्र यावेळेस संपूर्ण ताकदीने लोक माझ्या पाठीमागे आहेत लोक वर्गणीतून निधी जमा केला आहे. निवडणूक मी लढवणारच आणि जिंकणारच असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला. दोन राष्ट्रवादी काँग्रेस दोन शिवसेना आणि आता दोन स्वाभिमानी शेतकरी संघटना एकमेकांच्या समोर उभे ठाकल्या आहेत. रविकांत तुपकर यांच्या मोर्चाच्या वेळातच राजू शेट्टी जिल्ह्यात होते. काही काळ ते इथे थांबले आणि जालन्याकडे निघून गेले.
महत्त्वाच्या बातम्या: