पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत खासदारांना भिडला कार्यकर्ता
'स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावावर राजकारण करु नका, त्यांनी फक्त समाजकारणच केले. तुम्ही 10 वर्षे खासदार होता, पण एकदाही तुम्ही आमच्या भागात आला नाहीत', अशा शब्दात भाजपच्या बडे नावाच्या एका कार्यकर्त्याने खासदार दिलीप गांधी यांना खडेबोल सुनावले.
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत नगर शहरात चौक सभा घेण्यात आल्या. शहरातील एका सभेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या समोरच भाजप खासदार दिलीप गांधी यांना एका कार्यकर्त्याने भर सभेत खडेबोल सुनावले. 'स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावावर राजकारण करु नका, त्यांनी फक्त समाजकारणच केले. तुम्ही 10 वर्षे खासदार होता, पण एकदाही तुम्ही आमच्या भागात आला नाहीत', अशा शब्दात भाजपच्या बडे नावाच्या एका कार्यकर्त्याने खासदार दिलीप गांधी यांना खडेबोल सुनावले. यावेळी दिलीप गांधी यांना देखील राग अनावर झाला. 'विकास काय करायचा हे आम्हाला माहिती आहे, गटारीचं काम खासदारानं करायच नसतं, आम्हाला माहिती आहे तुमच काय पोट दुखत ते', असे सांगत खासदार दिलीप गांधी यांनी वेळ मारून नेली. विशेष म्हणजे हे सर्व प्रकरण पंकजा मुंडे व्यासपीठावर असताना झाल्याने चर्चेला एकच उधाण आले आहे.
उपद्रवी लोकांना हद्दपार करण्याची कारवाई महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी उपद्रवी लोकांना हद्दपार करण्याची कारवाई करत 113 जणांना शहरातून हद्दपार केले, तर 32 जणांना अटी-शर्तींवर शहरात राहता येणार आहे. आतापर्यंत एकूण 664 उपद्रवी लोकांचे प्रस्ताव प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सादर झाले होते. आतापर्यंत त्यातील 411 जणांना हद्दपार करण्यात आले असून 171 जणांना अटी व शर्तीवर महानगरपालिका निवडणूक काळात शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.