राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा नव्या वाटेवर? जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनवेळी भाजप नेत्यांची अनुपस्थिती
काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा वाट धरणार असल्याची चर्चा आहे. कारण विखे पाटलांच्या श्रीरामपूर संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजप नेते अनुपस्थित होते तर संपर्क कार्यालय उद्घाटनाच्या बॅनरवरुन भाजपही गायब होती. त्यामुळेच ही चर्चा सुरु झाली आहे.
शिर्डी : भाजप आमदार तथा माजी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा नव्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल आपल्या श्रीरामपूर येथील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाच्या फ्लेक्स बोर्डावरुन भाजप गायब होती. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील भाजप सोडणार का? अशा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सर्व चर्चा खोट्या असल्याच सांगत लोकसभा निवडणुकीत मी जो रस्ता निवडलाय तो योग्य असून मी समाधानी असल्याच स्पष्ट केलं. कार्यालयातील फलक हा केवळ श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासाठी रस्ता दाखवणारा असल्याच त्यांनी सांगितलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपचे जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणतेही नेते उपस्थित नव्हते. श्रीरामपुर येथे विखे पाटलांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले मात्र भाजपाचा झेंडा कुठेही दिसला नाही. नुकताच पंकजा मुंडे यांच्या संपर्क कायलायचे मुंबईत उद्घाटन झालं. त्यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमस्थळी लावलेला एक फ्लेक्स लक्ष वेधून घेत होते. ज्यात 'चलो एक पहल की जाए... नए रस्ते की ओर...' त्याचा नेमका अर्थ काय यावरुन उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे बाळासाहेब थोरात-राधाकृष्ण विखे एकाच सोफ्यावर
मात्र लोकसभा निवडणुकीत मी जो रस्ता निवडलाय तो योग्य असून मी समाधानी असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलंय. कार्यालयातील फलक हा केवळ श्रीरामपूर तालुक्यच्या विकासासाठी रस्ता दाखवणारा असल्याच त्यांनी सांगितलं आहे. श्रीरामपूर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यानी आग्रह केल्यानंतर हा वेगळा निर्णय केवळ तालुक्याच्या विकासासाठी घेतला असल्याच त्यांनी स्पष्ट केलं.
श्रीरामपुर येथील स्थानिक राजकारण बघीतलं तर मोठी घालमेल असल्याचं चित्र आहे. विखे समर्थक असलेले ससाणे थोरातांच्या जवळ गेले आहेत, तर काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत दाखल झाले आणि विखे पाटलांच्या जवळ आले. नगरपालिका, बाजार समिती, पंचायत समितीसह अनेक गावात विखे पाटील समर्थक पदाधिकारी आहेत. मात्र विखे पाटलांच्या पक्षबदलानंतर कार्यकर्ते अजूनही काँग्रेस किंवा इतर पक्षात आहेत. कदाचित त्यामुळेच श्रीरामपूर येथील संपर्क कार्यालयाला "राधाकृष्ण विखे पाटील संपर्क कार्यालय " असं म्हणण्यात आलं आहे.
मी भाजपचा कार्यकर्ता, भाजप सोडणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील
दरम्यान यानंतर एबीपी माझाशी बोलताना विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि इंदोरीकर यांच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली. इंदोरीकर महाराजांच्या बद्दल मला नितांत आदर आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर माझ्या दृष्टीने हा विषय संपला आहे. मात्र प्रबोधनकार मंडळींनी वक्तव्य करताना काळजी घेणं महत्वाचं असून त्यांच्या वक्तव्याचा मोठा परिणाम समाजावर होत असतो. त्यामुळे भविष्यकाळात इंदोरीकर महाराजांनी प्रभावीपणे प्रबोधन करावं हीच अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली.
एल्गार परिषदेच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना विखे यांनी थोरातांना टीकेच लक्ष्य केलं. बाळासाहेब थोरातांना हा विषय समजलेला नाही. कुणीतरी सांगतंय म्हणून ते प्रतिक्रिया देत आहेत. आज ज्यांच्याकडे सरकारचा रिमोट आहे ते सांगतील तशी वक्तव्य केली जातात, असा टोला शरद पवार यांना नाव न घेता त्यांनी लगावला. तर NIA ने तपास केला तर सत्य बाहेर येईल आणि तीच समाजाची इच्छा असून राज्यातील काही नेत्यांना याची चिंता का वाटत अशी टोला लगावला आहे.