शोध व बचावकार्य पूर्ण! भिवंडी इमारत दुर्घटनेत 38 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी
पोलीस प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा व इतर बाबी तपासल्यानंतर या दुर्घटनेत आता 38 जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी झाल्याचा आकडा दिला आहे.
भिवंडी : भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथील तीन माजली जिलानी इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी (21 सप्टेंबर) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाले आहेत . दरम्यान काही मृतांच्या नाव व आडनावावरून मृतांच्या आकडेवारीत बुधवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी उशिरापर्यंत तफावत येत होती. बुधवारी सायंकाळी 41 मृतांची माहिती बचावकार्यासह मनपा प्रशासनाकडून मिळत होती. मात्र पोलीस प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा व इतर बाबी तपासल्यानंतर या दुर्घटनेत आता 38 जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी झाल्याचा आकडा दिला आहे. दरम्यान चौथ्या दिवशी गुरुवारी सकाळी अकरा वाजता मृतदेहांची शोधमोहीम बचाव पथकाने थांबविली व त्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरए , अग्निशमन दल, पोलीस, श्वान पथक व बचाव पथकातील इतरांनी या इमारतीतील मृतांना श्रद्धांजली वाहिली .
तर या दुर्घटनेत एका अडीच वर्षांचा मुसीफ शब्बीर कुरेशी वय अडीच वर्ष या मुलाचा मृतदेह अजूनही मिळाला नसल्याने मुलाचे वडील शब्बीर कुरेशी हे अजूनही आपल्या मुलाची वाट पाहत इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ थांबले होते. तर नीलोफर शेख या आपल्या हरवलेल्या बहिणीचा शोध घेत आहेत.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांचे नातेवाईक आपल्या आप्त स्वकीयांची आठवण म्हणून या ढिगाऱ्यात काही मिळते का यासाठी शोधाशोध करत आहेत. एक एक पैसा जमवून हक्काचं घर घेतलं. स्वप्न पाहिले मात्र सर्व संसार डोळ्यादेखत गाडला गेला. ही करुण कहाणी जिलानी इमारतीतील वाचलेल्या कुटुंबाची आहे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढलेला आपला विस्कटलेला संसार शोधण्यात आता येथील रहिवासी गुंग झाले आहेत. ढिगाऱ्यात आपली हरवलेली वस्तू मिळत आहे का, या आशेने या नागरिकांच्या नजरा सैरावैरा फिरत आहेत.
या दुर्घटनेचा संपूर्ण तपास करण्यासाठी चार सदस्य चौकशी समिती नेमली असून येत्या सात दिवसात समिती अहवाल देणार आहे .तत्पूर्वी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या प्रभाग तिचे प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना यापूर्वीच निलंबित केले असून चौकशीनंतर या दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर इमारत कोसळण्याचे नेमकी कारण काय याची देखील चौकशी सुरु आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपाचे आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे.