बीड जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांडातील 12 आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी
बीड जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांडातील 12 आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या हत्याकांडातील तिन्ही मृतदेहांवर तब्बल 40 तासानंतर अंत्यविधी करण्यात आला.
बीड : जमिनीच्या वादातून केज तालुक्यातील मांगवडगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी 12 जणांवर युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीना न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तिहेरी हत्याकांडातील सर्व आरोपींना ताब्यात घेतले जाणार नाही. तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा, मृतांच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे तब्बल 40 तासांनंतर अंत्यविधी पार पडला.
तिहेरी हत्याकांडातील सर्व आरोपींना ताब्यात घेतले जाणार नाही आणि आमच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृतांच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे 14 मे पासून शवविच्छेदन झालेले तिन्ही मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागरात पडून होते. त्या घटनेला जवळजवळ 40 तास उलटून गेले होते. परिणामी नातेवाईक आणि जमाव संतप्त झाला होता. काही काळ मृतांच्या नातेवाईकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यानी मृतदेह ताब्यात घेतले. या तिन्ही मृतदेहांवर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे पारधी समाजाच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
सहा वर्षाच्या चिमुकलीची निर्दयी पित्याकडून हत्या, बीडमधील घटनेने खळबळ
मांगवडगाव येथील शेतीच्या वादातून बाबू शंकर पवार (वय 60) व त्यांची मुले प्रकाश बाबू पवार (वय 45) आणि संजय बाबू पवार (वय 40) तिघांचा खून करण्यात आला होता.
या प्रकरणी धनराज बाबू पवार यांच्या फिर्यादी वरून 1) सचिन मोहन निंबाळकर (वय 32), 2) हनंमुत मोहन निंबाळकर (वय 33), 3) राजेभाऊ काशिनाथ निंबाळकर (वय 45), 4)प्रभु बाबुराव निंबाळकर (वय 75), 5) बालासाहेब बाबुराव निंबाळकर (वय 55), 6) राजाभाऊ हरीचंद्र निंबाळकर (वय 35), 7) अशोक अरूण शेंडगे (वय 24), 8) कुणाल राजाभाऊ निंबाळकर (वय 19), 9) शिवाजी बबन निंबाळकर (वय 48 वर्षे, 10) बबन दगडू निंबाळकर (वय 80), 11) जयराम तुकाराम निंबाळकर (वय 29), सर्व रा. मांगवडगाव ता. केज आणि 12) संतोष सुधाकर गव्हाणे (वय 42) रा. माळेगाव ता. केज या बारा आरोपी विरोधात गु. र. नं. 106/2020 भा.दं. वि. 143, 147, 148, 149, 302, 307, 120(ब), 435, 427 सह 4,25 मोटार वाहन कायदा कलम शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम 184 आणि अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायदा कलम 3(1) (जी) 3(2) (व्ही) (ए) 4(2) (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी आज या सर्व आरोपीना सत्र न्यायालय अंबाजोगाई न्यायालयाने 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Beed Murder | बीडमध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, 12 संशयित ताब्यात