"गड आला पण सिंह गेला"... क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेले तासगाव तालुक्यातील ढवळी गावचे अतुल पाटील पॅनेलसहित विजयी
क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेले तासगाव तालुक्यातील ढवळी गावचे अतुल पाटील विजयी झाले आहे.
सांगली : आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. अतुल हा ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभा होता. आज झालेल्या मतमोजणीत तो 333 मतांनी निवडून आला आहे. याशिवाय अतुलने पुढाकार घेऊन उभारलेले शिवशंभू पॅनेलही 11 पैकी 10 जागांवर विजय मिळवत निवडून आले आहे. मात्र हे पाहण्यासाठी आज अतुल हयात नाही. ढवळीकरांना मागील जे 66 वर्षात जमले नव्हते ते अतुलने करत गावातील गट तट एकत्र करून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने मेहनत घेत गावातील राष्ट्रवादी-भाजपचा गट देखील एकत्र आणला. पण काही तरुणांच्यामुळे 11 जागांसाठी ही निवडणूक लागली होती. यात अतुल पाटील आणि त्याचे पॅनेलही निवडून आले पण आज अतुल हयात नाही.
अतुल पाटील हा खासदार संजय पाटील समर्थक तसेच ढवळी गावचा माजी उपसरपंच होता. यंदा तो सरपंच पदाचा दावेदार देखील होता. पण नियतीने क्रूर डाव खेळत अतुलसह त्याचे पॅनेल निवडून आणले. मात्र अतुलला दुसरीकडे अनंतात विलीन केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेसाठी गड जिंकला हे ऐकल्यानंतर जे शब्द काढले तेच शब्द, तीच भावना अतुलेने उभारलेल्या पॅनेलमध्ये , त्याच्या मित्र परिवारात, गावकऱ्यांत आहे. ती म्हणजे" गड आला पण सिंह गेला" . निकालानंतर या आशयाच्या पोस्ट देखील फिरू लागल्या.
आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. तीनच्या सुमारास ही घटना घडली होती.आटपाडी येथे गुरुकुल विद्यालयाजवळच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरू होती. ढवळी येथील अतुल पाटील तासगांव संघाचे प्रतिनिधित्व करत होते. सामना सुरू असताना अतुल पाटील यष्टीरक्षण करत होते. अचानक ते मैदानावर कोसळले. त्यानंतर त्यांना सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.