अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीत नाराजीचा सूर
सरकार स्थापन करत असताना दिल्लीत बैठका झाल्या. त्यात तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला होता. त्यावर फक्त शिवसेनेनेच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सह्या केल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.
मुंबई : काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. संविधानाच्या उद्देशिकेबाहेर काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घ्या, असं सोनिया गांधी यांनी सांगितल्याचं अशोक चव्हाण नांदेडमधील एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.
यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. मात्र नंतर माफी मागितली. आता अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने नाराजी निर्माण झाली आहे.
अशोक चव्हाण काय म्हणाले होते?
अशोक चव्हाण म्हणाले की, "तीन पक्षांचं सरकार, तीन विचाराचं सरकार चालणार कसं असा प्रश्न आम्हाला विचारला जात होता. दिल्लीतल्या आमच्या नेत्यांना भेटलो, ते म्हणाले, आम्ही बिलकुल परवानगी देणार नाही. रोज भांडणं होतील, रोज प्रश्न निर्माण होतील. सरकार चालवणार कसं? मी मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. परंतु आमच्या नेत्या सोनिया गांधींनी सांगितलं पहिलं हे लिहून घ्या की संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे जाता येणार नाही आणि असं झालं तर सरकारच्या बाहेर पडायचं. एवढ्या कडक सूचना आम्हाला सरकार बनवण्यापूर्वी देण्यात आल्या. जे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं, ते म्हणाले, काही हरकत नाही आणि त्याच्याबाहेर जाणार नाही. घटना हीच शिवधार्य मानून, घटनेच्या चौकटीत राहून सरकार चालणार आहे, अशाप्रकारची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली."
अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकीची : नवाब मलिक
अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकीची आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले. " सरकार स्थापन करत असताना दिल्लीत बैठका झाल्या. त्यात तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला होता. त्यावर फक्त शिवसेनेनेच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सह्या केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
कोणताही लेखी करार नाही : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'शिवसेनेनं असं काहीही लिहून दिलेलं नाही. संविधानाच्या चौकटीत राहून सरकार चालवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
आम्ही सत्तेसाठी नाहीतर तत्वांसाठी एकत्र आलो : अशोक चव्हाण
घडलेल्या सर्व प्रकरणानंतर अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर दिवसभर टीका झाल्यानंतर संध्याकाळी एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, 'आमची भूमिका जी आहे तिच आहे. ज्यावेळी तीन पक्षांचं सरकार गठीत झालं, त्यावेळी आम्ही एक कॉमन मिनियम प्रोग्राम तयार केला होता. त्यावेळी तिनही पक्षाच्या नेत्यांनी त्यावर संमती दर्शवली होती. त्याप्रमाणे सरकार चाललं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, यामध्ये काहीच चुकीचं नाही. तसेच आम्ही सत्तेसाठी नाहीतर तत्वांसाठी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे तत्त्वांनुसार काम व्हावं हिच आमची अपेक्षा आहे.