(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur : वैष्णवांच्या मेळ्यात राजकारण , मुख्यमंत्र्यांना रोखण्यासाठी धनगर समाज मेंढ्यांसह वेशीवर दाखल
धनगर समाजाने समाज बांधवाना पंढरपूरकडे येण्याचे आव्हान केले होते . त्यानुसार आता ठिकठिकाणाहून धनगर समाज पंढरपूरच्या वेशीवर पोचू लागल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे .
सोलापूर : आषाढी सोहळा (Ashadhi Ekadashi) हा खरे तर वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च महासोहळा असतो . यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात . मात्र अशा मंगलमय प्रसंगी विविध संघटना आपल्या प्रलंबित प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना अडविण्याचा भूमिकेत येऊन या सर्व सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असतात. आषाढीच्या महापूजेसाठी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून तो मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो . मात्र आपल्या मागण्यासाठी इथे मुख्यमंत्र्यांना अडवले की त्याची चर्चा राज्यभर होऊन आपले प्रश्न सुटतात असा अनुभव विविध संघटनांना येत असल्याने प्रत्येक आषाढी आणि कार्तिकीच्यावेळी मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनी अडविण्याचा प्रयत्न होत असतो .
यावर्षी आता आपल्या विविध मागण्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना अडविण्यासाठी अनेक संघटना तयारीत आहे. धनगर समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या मान्य न झाल्याने यावेळी मुख्यमंत्र्यांना पुजेपासून रोखण्यासाठी विठ्ठल मंदिराला मेंढ्यांचे रिंगण घालण्याचा इशारा धनगर समाजाने दिला होता . धनगर समाजाच्या मागण्यात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा ही मागणी असून यासोबत अण्णासाहेब पाटील महामंडळाप्रमाणे धनगर तरुणांना कमी व्याजात कर्ज देणारे महामंडळ स्थापन करावे , पंढरपुरात अहिल्यादेवी होळकर भवन उभे करावे अशा इतर मागण्यासाठी धनगर समाज आपल्या मेंढ्यांसह पंढरपूरच्या जवळ पोचला आहे. आमच्या मागण्या मुख्यमंत्री आणि प्रशासनाला कळवून देखील त्याची दाखल न घेतल्याने धनगर समाजाने समाज बांधवाना पंढरपूरकडे येण्याचे आव्हान केले होते . त्यानुसार आता ठिकठिकाणाहून धनगर समाज पंढरपूरच्या वेशीवर पोचू लागल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे .
पंढरपुरात अहिल्या भवन उभारण्याची मागणी
एकाबाजूला महादेव कोळी समाजानेही आंदोलनाचा इशारा दिला असून दुसऱ्या बाजूला सकल मराठा समाज आपली भूमिका 13 जुलैच्या निर्णयानंतर जाहीर करणार आहे . एकाबाजूला लाखोंचा वैष्णव समाज पंढरीत आपल्या लाडक्या विठूरायाची येत असताना या आंदोलनामुळे मात्र यात पुन्हा राजकारण शिरू लागले आहे. गेल्या कार्तिकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना अडविल्यावर त्यांनी पंढरपूरला 5 कोटीचे मराठा भवन दिले होते . आता धनगर समाजाने मुख्यमंत्र्यांना अडवून आपल्या मागण्या मांडताना पंढरपुरात अहिल्या भवन उभारण्याची मागणी केली आहे .
हे ही वाचा :
धनगर- मुस्लिमसह इतर समाजाच्या आरक्षणाचा विषयही मार्गी लागला पाहिजे, मोठा भाऊ म्हणून मराठा समाज पुढाकार घेणार, मनोज जरांगे म्हणाले...