(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
राज्यात महायुतीला तब्बल 237 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धनजंय मुंडे परळी मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. काही मतदारसंघ वगळता शांततेत आणि सुरळीत मतदान पार पडले. मात्र, मंत्री धनजंय मुंडे यांच्या परळी (Parli) मतदारसंघातील घाटनांदूर गावातील काही मतदान केंद्रावर चांगलाच राड झाल्याचं पाहायला मिळालं. धनंजय मुंडेंच्या (Dhanajay munde) गुंडांनी लोकशाहीला पायदळी तुडवत हुकूमशाही पद्धतीने मतदान यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप विरोधकांनी केला. येथील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनीही मुंडेंवर आरोप करत मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याचे म्हटले होते. परळी मतदारसंघातील या घटनेचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियातून (Social media) समोर आले. या व्हिडिओवर समाजमाध्यमांतून टीकाही झाल्याचं आपण पाहिल. आता, निवडणूक निकालानंतर शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन परळीतील मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची तुलना थेट पाकिस्तानशी केली आहे.
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला, राज्यात महायुतीला तब्बल 237 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धनजंय मुंडे परळी मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. जवळपास दीड लाखांपर्यंतचं मताधिक्य त्यांना मिळालं आहे. मात्र, परळीतील काही मतदान केंद्रांवर बोगस व दमदाटी करुन मतदान झाल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. आता, संजय राऊत यांनी त्यापैकीच एक व्हिडिओ ट्विट करत अशी निवडणूक पाकिस्तान आणि अफगानिस्तानातही होत नसेल, असे म्हटले आहे. लोकशाहीतील विचलित करणारे हे दृश्य आहे परळी मतदार संघातील आहे. अशा प्रकारच्या निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये सुद्धा होत नसतील. मतदाराना केंद्रावर येऊच दिले नाही, दहशत माजवून पळवून लावले. निवडणूक आयोग जिवंत आहे काय?, असा सवाल संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर करताना विचारला आहे. मात्र, हा व्हिडिओ परळीतील नेमका कुठला आहे, नेमकं काय घडलं होतं ते पाहावे लागेल.
लोकशाहीतील विचलित करणारे हे दृश्य आहे परळी मतदार संघातील.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2024
अशा प्रकारच्या निवडणुका पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये सुद्धा होत नसतील.
मतदाराना केंद्रावर येऊच दिले नाही.
दहशत माजवून पळवून लावले.
निवडणूक आयोग जिवंत आहे काय?
@ECISVEEP
@AmitShah
@Dev_Fadnavis pic.twitter.com/A7GbGeDwHu
मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं
परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात माधव जाधव हे मतदान केंद्रावर गेले असता धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. परळी मतदारसंघातील 122 मतदान केंद्र संवेदनशील असून त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त लावण्याची मागणी जाधव यांनी केली होती. जाधव यांच्या मागणीचा हाच राग मनात धरुन त्यांच्यावर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप जाधव यांनी केला. दरम्यान, त्याचे पडसाद घाटनांदुर मतदान केंद्रावर पाहायला मिळाले होते, तेव्हापासून हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.