![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
APMC Election 2023 Result Live Updates : मालेगाव बाजार समितीत मंत्री दादा भुसेंना धक्का, अद्वय हिरे यांच्या पॅनेलचा विजय
APMC Election 2023 Result Live Updates : 95 बाजार समित्यांची आज (29 एप्रिल) मतमोजणी होणार आहे. तर काही ठिकाणी आज मतदान होणार आहे.
LIVE
![APMC Election 2023 Result Live Updates : मालेगाव बाजार समितीत मंत्री दादा भुसेंना धक्का, अद्वय हिरे यांच्या पॅनेलचा विजय APMC Election 2023 Result Live Updates : मालेगाव बाजार समितीत मंत्री दादा भुसेंना धक्का, अद्वय हिरे यांच्या पॅनेलचा विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/925b5060b728c1876f889ee1143ba6f01682733418437339_original.png)
Background
APMC Election 2023 Result Live Updates : ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यापैकी 95 बाजार समित्यांची आज (29 एप्रिल) मतमोजणी होणार आहे. तर काही ठिकाणी आज मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय. मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे. तर 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे.
नाशिकच्या देवळा बाजार समितीवर भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता
नाशिकच्या देवळा बाजार समितीवर भाजप जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर यांच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 17 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. देवळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सर्व समावेशक पॅनलची निर्मिती केली होती. यापूर्वी या पॅनलच्या 8 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. आज झालेल्या 10 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळवला. पॅनल विजयी होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी विकासासाठी पक्षीय जोडे बाजुला ठेवून पॅनलची निर्मिती केल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी सांगितलं.
मोर्शी बाजार समितीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडेंना धक्का
अमरावतीमध्ये मोर्शी बाजार समितीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांना धक्का बसला आहे. मोर्शी बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी तर भाजप, काँग्रेस (एक गट) 8 उमेदवार विजयी झाले आहे. हा अनिल बोंडे यांना धक्का मानला जातोय.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसती एकहाती सत्ता
भाजपाचे आमदार रमेश कराड यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं आव्हान दिलं होतं. मात्र, भाजपमधील गटा-तटाचं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्याचाच फटका भाजपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बसला आहे. 18 जागा एक हाती स्वतःकडे खेचत काँग्रेसने मोठा विजय मिळवला.
Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळली
Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरातील तीन मजली इमारत कोसळली आहे. वर्धमान असे या इमारतीचे नाव असून 50 ते 60 जण डिगारे खाली दाबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली आहे.
Nashik APMC Election : डिजेला बंदी फक्त नावालाच, राष्ट्रवादी आमदाराची डिजेच्या तालावर विजयी मिरवणूक
Nashik APMC Election : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार दिलीप बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी अकरा जागांवर विजय मिळवला. अशातच डिजे साउंड सिस्टीमवर गाणे लावत मिरवणूक काढण्यास बंदी असतांना देखिल बाजार समितीच्या आवारात डिजेचा दणदणाट करत ट्रॅक्टरवर विजयी मिरवणूक काढण्यात आली. मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडताच बनकर यांच्या समर्थकांकडून गुलाल उधळत, डिजेच्या तालावर नाचत जल्लोष साजरा करण्यात आला. पोलीस आता यावर काही कारवाई करणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
जामनेर बाजार समितीमध्ये भाजप शिंदे गटाचे पॅनल आघाडीवर
APMC Election : जामनेर बाजार समितीमध्ये भाजप शिंदे गटाचे पॅनल आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. 18 पैकी 12 जागांवर भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्या शेतकरी सहकार पॅनल ने विजय मिळवला आहे. गड राखण्यात मंत्री गिरिश महाजन हे यशस्वी ठरले असून महविकास आघाडीच्या पॅनल चां याठिकाणी पराभव झाला आहे.
मावळमध्ये आमदार सुनील शेळकेंचा बाळा भेगडेंना झटका, मविआचे 17 सदस्य विजयी
Pune : पुण्याच्या मावळमध्ये महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवत, भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला धक्का दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना पुन्हा एकदा झटका दिलाय. मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर मविआचे सतरा तर भाजप-शिंदे गटाचा एका सदस्याची वर्णी लागली आहे. मविआच्या सतरा सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा तर काँग्रेसच्या दोघांचा समावेश आहे. या विजयानंतर मविआने मोठा जल्लोष केला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आणि बाजार समितीला नवसंजीवनी देण्याचा विश्वास मविआने व्यक्त केलाय.
Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीत चुंभळे गटाने खातं उघडलं; प्रल्हाद काकड विजयी
Nashik APMC Election : नाशिक बाजार समिती निवडणुकीत शिवाजी चुंभळे गटाने खाते उघडले असून शेतकरी विकास पॅनलचे प्रल्हाद काकड विजयी झाले आहेत. आपलं पॅनलचे विश्वास आप्पा नागरे यांचा पराभव केला असून काकड हे शंभर हुन अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)