Sagareshwar Deer Sanctuary Sangli : राज्यातील एकमेव मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्य कात टाकणार
वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सागरेश्वर अभयारण्याच्या (Sagareshwar Deer Sanctuary Sangli) समस्या आणि विकासाचा आढावा घेत अभयारण्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

Sangli : महाराष्ट्रातील एकमेव असे मानव निर्मित अभयारण्य म्हणून सांगली जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याची (Sagareshwar Deer Sanctuary Sangli) ओळख आहे. मात्र, हेच अभयारण्य अनेक दिवसांपासून समस्यांच्या गर्तेत सापडले होते. मात्र, आता वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सागरेश्वर अभयारण्याच्या समस्या आणि विकासाचा आढावा घेत अभयारण्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
पलुस आणि कडेगाव वन विभागाच्या क्षेत्रातील समस्यासंदर्भात नुकतीच मुंबईत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत सागरेश्वर अभयारण्याच्या (Sagareshwar Deer Sanctuary Sangli) विकासाबाबत आणि अभयारण्याच्या भोवताली शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सागरेश्वर अभयारण्याला मजबूत संरक्षक भिंत नसल्याने प्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करत होते. त्याचबरोबर यामध्ये प्राणी देखील दगावण्याच्या घटना घडल्या होत्या.
अभयारण्य परिसरात अवैध वृक्षतोड देखील होत होती. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर देखील वन विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी आमदार अरुण लाड यांच्याकडे याबाबतीत तक्रारी केल्या होत्या. यावर या बैठकीत सखोल चर्चा झाल्यानंतर सागरेश्वर अभयारण्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याला मजबूत कुंपण उभारणे, जल मृदसंधारण करणे, गवत कुरण विकास करणे, आग नियंत्रण ही अभयारण्यामधील कामे प्राधान्याने करून घेण्यात येणार आहेत.
या भागातील अवैध वृक्षतोड थांबवून सागरेश्वर अभयारण्यामध्ये (Sagareshwar Deer Sanctuary) हरणांकरिता चारा उपलब्ध करावा. सागरेश्वर अभयारण्य विकसित करताना स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेवून वन विभागाने कामे करावीत अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. अभयारण्यातील वन विभागातंर्गत करता येतील अशी कामे स्थानिक ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेवून पूर्ण करण्यात यावीत. अभयारण्याच्या विकासाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जी कामे करता येणे शक्य आहेत, त्याचा तत्काळ प्रस्ताव बनवावा आणि ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना वन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या भागात अवैध वृक्षतोडी संदर्भातही वन विभागाने तत्काळ कारवाई करावी अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या.
सागरेश्वर अभयारण्य उत्कृष्ट पध्दतीने विकसीत करावे जेणेकरून या अभयारण्यामध्ये पर्यटन देखील वाढण्यास मदत होईल त्यादृष्टीने प्रयत्न करावे अशा सूचना करण्यात आलेत. बैठकीनंतर या अभयारण्या संदर्भात दहा दिवसाच्या आत केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करावी, अशा सुचनाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी बैठकीत दिल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Rajya Sabha Election LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरु; विधानभवनातील प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
