(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Workers Strike : शरद पवारांच्या घरावर आंदोलन; भाजप नेते अनिल बोंडेंचे चिथावणीखोर वक्तव्य
BJP Leader On ST Workers Protest: एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या आंदोलनानंतर भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे.
BJP Leader On ST Workers Protest: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असणाऱ्या 'सिल्वर ओक'वर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर भाजप नेते आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. शरद पवारांचे शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहे. फ्रान्सच्या राजासारखी थोडीफार पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांनी म्हटले.
एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरी अचानकपणे आक्रमक आंदोलन केले. आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या दिशेने चप्पल फेकीसह दगडफेकही केली. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
अमरावतीमधील भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी शरद पवारांवर टीका करताना चिथावणीखोर वक्तव्य केले. फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात शिक्षा दिली होती. त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये होत आहे. ह्या राज्यात जेव्हा माझीच सुरक्षा नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय? असं शरद पवार यांनी स्वत: जाहीर करावे आणि त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी. अशी मागणी भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी केली. अनिल बोंडे यांनी याआधीदेखील तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले होते.
तर, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सिल्वर ओकवरील आंदोलनाचा निषेध केला. मात्र, या आंदोलनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव गोवणे चुकीचे असल्याचे म्हटले.
प्रविण दरेकर यांनी म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांना गेली पाच महिने दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. लढू किंवा मरू या स्थितीत कर्मचारी असल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या सगळ्या परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे असल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवार यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत आश्वासन दिलं होतं. मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याने एसटी कर्मचारी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी गेले असतील असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: