(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Strike : शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन; राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश आहे का?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील घरासमोर संपकऱ्यांच्या एका गटाने आंदोलन करत थेट चप्पल फेक केल्याची घटना घडली आहे.
मुंबई: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन केलं. इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले आणि ते थेट पवारांच्या घराच्या परिसरात घुसले. ही एवढी मोठी घटना म्हणजे राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश असल्याचं मानलं जातंय.
राज्यातील कोणतेही आंदोलन असो वा मोठी घडामोड असो, सर्वप्रथम राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला त्याची कुणकुण लागते. पण शरद पवारांच्या घरासमोरील घडलेल्या घटनेनं मात्र राज्य गुप्तचर यंत्रणेचं अपयश चव्हाट्यावर आणलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. पण तरीही आंदोलक त्यांच्या घराच्या परिसरात आले आणि त्या ठिकाणी चप्पल फेक करत जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. हे पोलीस यंत्रणा असेल वा राज्यातील गुप्तचर यंत्रणेला कसं काय समजलं नाही, किंवा त्याची कुणकुण कशी काय लागली नाही याचे आश्चर्य व्यक्त केलं जातं. पोलिसांना या घटनेचा अंदाज कसा आला नाही, ही गोष्ट कशी समजली नाही असा सवाल रायगडचे खासदार सुनिल तटकरेंनी केला आहे.
आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश घेतला आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. यावेळी त्या घरामध्ये शरद पवारांच्या पत्नी आणि नात असल्याचं सांगितलं जातंय.
राज्याचं लक्ष लागून असलेल्या आणि गेल्या पाच-सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर काल, गुरुवारी उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. विलिनीकरणाची मागणी सोडली तर संपकरी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने कबूल केल्या आहेत. यानंतरही आज संपकऱ्यांच्या एका मोठ्या गटाने शरद पवारांच्या मुंबईतील घराच्या परिसरात येऊन जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या:
- ST Workers Protest : शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक; एसटी कर्मचारी आक्रमक
- Sharad Pawar : माझ्या घरावर झालेला हल्ला दुर्दैवी, पण तरीही आम्ही चर्चेसाठी तयार; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- ST Workers Protest: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दाबल्यानेच उद्रेक; प्रविण दरेकर यांची प्रतिक्रिया