'प्रभू, पवारसाहेबांना सद्बुद्धी दे, नाहीतर महाराष्ट्राची त्यांच्या तावडीतून सुटका तरी कर', भाजप नेत्याचं पत्र
Anil Bonde Letter To Sharad Pawar : अनिल बोंडे यांनी शरद पवारांना पत्र लिहून आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र विदर्भावर अन्याय न करण्याची सद्बुद्धी देवो याकरता देवाकडे साकडं मागणार आहे असं म्हटलं आहे.
Anil Bonde Letter To Sharad Pawar : माजी मंत्री तथा भाजप नेते डॉ.अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक पत्र लिहिलं आहे. बोंडे यांनी शरद पवारांना पत्र लिहून आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र विदर्भावर अन्याय न करण्याची सद्बुद्धी देवो याकरता देवाकडे साकडं मागणार अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा 10 तारखेला अमरावतीमध्ये नियोजित दौरा आहे. त्यांच्या अमरावती येथील दौऱ्यावर माजी मंत्री तथा भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी टीका करून प्रभू श्रीरामचंद्राच्या नवमीला होत असलेल्या आगमनावर पवार साहेबांना विदर्भाला सावत्र वागणुकीऐवजी न्याय करण्याची सद्बुद्धी प्रभू श्रीरामचंद्रांनी द्यावी असे साकडे डॉ. अनिल बोंडे यांनी भगवान श्री रामाकडे मागितले आहे.
पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, विदर्भाने शरद पवार यांच्या सर्व कारकीर्द पाहिली. विदर्भाला डावलून पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप देण्याची त्यांची वृत्तीही पाहली. पवार साहेबांच्या समक्ष विदर्भातील सिंचनाचा अनुशेष निर्माण झाला. ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्र सिंचनानी परिपूर्ण झाला तेव्हा विदर्भ कोरडा राहिला. त्याचीच परिणीती विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये झाली. साखर सम्राटाचे हित जोपासणारे पवार साहेब कापूस पट्ट्यासाठी दुर्दैवाने कधीच उदार झाले नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
बोंडेंनी म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये बळीराजा योजनेच्या माध्यमातून काही धरणे पूर्ण झालीत. जलयुक्त शिवार बंद पाडून जलसंधारणाची लहान लहान कामे सुद्धा थांबवली. अमरावतीची पंचतारांकित एम.आय.डी.सी. आपल्या काळात पडीकच होती. देवेंद्र फडणवीस सरकार मध्येच पहिल्यांदा रेमंड, गुप्ता, व इतर टेक्स्टाईल कंपन्याचे कारखाने सुरु झाले. अमरावतीच्या पालकमंत्र्याला जणू आपलं मविआ सरकार कवडीची किंमत देत नाही आणि त्यामुळे अमरावती एम.आय.डी.सीमध्ये कोणतीही नवीन प्रकल्प सुरु झाले नाही.
पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, आपल्या सरकारमधील बहादरांनी मोर्शीचे मस्यविज्ञान महाविद्यालय सुद्धा पळवलं. अमरावती नांदगाव पेठ एम.आय.डी.सी. मध्ये या अडीच वर्षाच्या काळात रोजगारासाठी कोणताही उद्योग आला नाही. अमरावतीला आले तर दोन चार कारखाने घेऊन आले असते तर आम्ही पायघड्या पसरून स्वागत केले असते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, अमरावती शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. आपल्या मनातील विदर्भाचा दुजाभाव नष्ट करा. विदर्भाला न्याय देण्याची बुद्धी जर शरद पवार साहेबांना होत नसेल तर देवा त्यांच्या आशीर्वादाचं मविआ सरकार दूर कर तेव्हाच विदर्भाला न्याय मिळू शकेल, असं बोंडे यांनी म्हटलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha