(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tiware Dam Burst | तिवरे धरण फुटीबाबत दुसरा अहवाल राज्य शासनाकडे सादर
कोकण विभागातील जलसंपदा पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी पाहणी दौर्यात सहभागी झाले होते. नवीन चौकशी समितीने आपला अहवाल शासनाकडे दिला आहे.
रत्नागिरी : तिवरे धरण फुटीबाबतच्या प्रमुख कारणांचा सविस्तर तपशील असलेला दुसरा अहवाल नव्याने नियुक्त केलेल्या समितीमार्फत राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे. तिवरे धरण फुटल्याने त्यात 23 ग्रामस्थांचा बळी गेला होता. पाण्याचा लोंढा अचानकपणे वाढल्याने धरण फुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. काही अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी बांधकामातील तांत्रिक चुकांमुळे धरण फुटल्याचा आरोप केला होता. धरण फुटण्यामागील मुख्य कारणांची शहानिशा करण्यासाठी पाटबंधारे विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन राज्य शासनाने एक समिती स्थापन केली होती. विधानसभा निवडणुकीच्या निवडणुका होण्यापूर्वी या समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर पहिल्या समितीच्या अहवालात धरणफुटी बाबतची वस्तूस्थिती स्पष्टपणे नमूद केलेली नसल्याचे नवीन शासनाच्या निदर्शनास आले.
तिवरे धरणफुटी याबाबतची वस्तुस्थिती सर्वांना समजावी यासाठी नवीन शासनाने दुसरी चौकशी समिती नेमली आहे. माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पुणे जलसंपदा विभागाचे अप्पर आयुक्त सुनील कुशीरे, याच विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणेले हे समितीतील सदस्य म्हणून कार्यरत आहेत. चौकशी समितीचे अध्यक्ष, सदस्य यांनी तीवरे धरणावर जाऊन शासनाला अपेक्षित असलेली माहिती संकलित केली होती. कोकण विभागातील जलसंपदा पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी पाहणी दौर्यात सहभागी झाले होते. नवीन चौकशी समितीने आपला अहवाल शासनाकडे दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होताच या अहवालाची तपासणी शासनामार्फत करण्यात येईल. त्यानंतरच तिवरे धरण नेमके कोणत्या कारणामुळे फुटले याबाबतची वस्तुस्थिती शासनामार्फतच अधिकृतरित्या जाहीर केली जाणार आहे.
तिवरे धरणफुटीमागचा 'खेकडा' कोण?
2 जुलै 2019 रोजी रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी धरण फुटलं आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. धरण फुटलं आणि पाण्याच्या प्रवाहाच्या बाजुला असलेली ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसलं आणि तिथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या पाण्यात शेती वाहून गेली. तिवरे धरण 2000 या साली मातीचा वापर करुन बांधण्यात आलं होतं. तेव्हापासून या धरणात पाणी साठत होतं. जेव्हा धरण गळू लागलं, तेव्हा याच्या तक्रार ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वारंवार केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.