Police Bharti : तरुण-तरुणींसाठी खुशखबर, राज्यात डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती; मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदं
Maharashtra Police Recruitment: पोलीस दलातील तब्बल साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
Police Bharti : पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी खुशखबर. राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस दलातील तब्बल साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यापैकी तब्बल बाराशे पदं मुंबई पोलीस दलासाठी भरली जाणार आहेत.
राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास 35 हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया (Maharashtra Police Recruitment) राबवण्यात आलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा साडेसात हजार पदांसाठी डिसेंबरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यात 2022 आणि 2023 मध्ये मोठ्या पोलीस भरती (Police Bharti) प्रक्रियेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे.
कोरोना काळात रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया
कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात हैदोस माजवला होता. त्यानंतर संपूर्ण जग ठप्प झालं होतं. याच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुमारे तीन वर्ष राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. झपाट्यानं वाढणाऱ्या लोकसंख्येपुढे पोलिसांचं संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे 18 हजार आणि 17 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. परंतु त्या तुलनेनं आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणं अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी लवकरात लवकर सध्याची 14 हजार 471 पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागानं सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत 25 जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक, शिपाई आणि पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदान न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीरानं घेण्यात आलेली. सध्याची पोलीस भरती प्रक्रिया संपल्यानंतर राज्यात नवी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
एकट्या मुंबई पोलीस दलात बाराशे पदांसाठी भरती
डिसेंबरमध्ये राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुंबईत गेल्या वर्षी आठ हजार पदांची भरती झाली होती. त्यातील बहुतांश पोलीस त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलीस दलात दाखल होणार आहेत. मुंबईत 4230 पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे 5 लाख 69 हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी दोन हजार 572 पोलीस हवालदार, 917 चालक, 717 तुरुंग हवालदार आणि 24 बँड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आलेत.
महिला पोलीस भरतीसाठी पावणेतीन लाख अर्ज
राज्यात महिला पोलीस भरतीसाठी यावेळी 3924 पदांसाठी पावणेतीन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मुंबईला सर्वाधिक पसंती असून एक लाखांहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :