Thane Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न, ब्ल्यूटूथ चिकटपट्टीनं मांडीला चिकटवली अन् कॉपी केली; रंगेहाथ पकडलं, गुन्हा दाखल करुन अटक
Thane Police Bharti : ठाण्यातील पोलीस भरती प्रक्रियेत घडलेल्या घटनेनं पोलीस होऊ घातलेल्या अनेकांना धक्का बसला आहे. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोबाईलमधून कॉपी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.
Thane Police Bharti : ठाणे : ठाणे शहर पोलीस दलातील रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली. पोलीस दलातील 686 जागांसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज देखील केले. राज्यात अनेकांचा पोलीस होण्याचं स्वप्न असतं. अनेकजण त्यासाठी अथक परिश्रम आणि मेहनतही घेत असतात. पण ठाण्यातील पोलीस भरती प्रक्रियेत घडलेल्या घटनेनं पोलीस होऊ घातलेल्या अनेकांना धक्का बसला आहे. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोबाईलमधून कॉपी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.
ठाणे पोलीस दलातील 686 जागांसाठी गेल्या काही दिवसांपासून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी आणि शारीरिक चाचणी पार पडली. त्यानंतर रविवारी याच भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. पण, या परीक्षेत घडलेल्या कॉपी प्रकरणामुळे पोलीस भरती परीक्षा घेणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या परीक्षेमध्ये मोबाईलमधून कॉपी करणाऱ्या जालन्यातील दोघांवर आणि छत्रपती संभाजीनगरमधील एकावर कारवाई करण्यात आली आहे. या तिन्ही परीक्षांर्थींविरोधात वर्तकनगर आणि वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मांडीला चिकटपट्टीनं ब्ल्यूटूथ चिकटवून कॉपी
अटक करण्यात आलेले तिघे मोबाईलमधून कॉपी करत होते. त्यापैकी जालन्यातील एकानं चिकटपट्टीच्या सहाय्यानं मांडीला ब्ल्यूटूथ चिकटवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ज्ञानसाधना महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर जालना जिल्ह्यातील अर्जुन सुंदर्डे (वय 22) या उमेदवारानं कॉपी केल्याचं आढळलं. त्यावेळी त्याची झडती घेतली असता, त्यानंही ब्ल्यूटूथ इअर पीस हे इलेक्ट्रॉनिक गॅझेट मांडीला चिकटपट्टी लावून चिकटवल्याचं समोर आलं.
परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या नातेवाईकांशी संगनमत करून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश केल्याचं आढळून आलं. त्यानंतर अर्जुन सुंदर्डे याच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल पवार यांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मायक्रो बॉक्सद्वारे परीक्षेत आलेले प्रश्न परीक्षा केंद्राबाहेर बसलेल्या साथीदारांना सांगून त्यांची उत्तरं पेपरमध्ये सोडवताना जालन्यातील आनंदसिंह दुलत (वय 20) आणि छत्रपती संभाजीनगरातील एका तरुणावरही कारवाई करण्यात आली असून दोघांनाही अटक केली आहे.
पोलीस हवालदाराच्या मुलाला कॉपी करण्यासाठ मदत, चौघांचं निलंबन
ठाणे ग्रामीण पोलीस दलात एका पोलीस हवालदाराच्या मुलाला लेखी परीक्षेमध्ये मदत केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्याकडून कठोर कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदाराच्या मुलाला लेखी परीक्षेमध्ये मदत केल्याप्रकरणी पर्यवेक्षक असलेल्या पोलीस उपनिरीक्षकासह चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.