Breaking News : रेकॉर्ड ब्रेक... MPSC चा सुपरफास्ट निकाल; मुलाखतीनंतर अवघ्या दोनच तासात लावली मेरिट लिस्ट
MPSC Result : एमपीएससीने अवघ्या आज मुलाखत घेतली आणि अवघ्या दोन तासामध्ये मेरिट लिस्ट लावण्याचा विक्रम केला आहे.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षा झाल्यातरी वर्षानुवर्षे निकाल रखडला जातो असा आरोप नेहमीच केला जातोय. पण आता हा डाग असेल किंवा आरोप असेल, एमपीएससीने मिटवण्याचा चंग बांधल्याचं दिसतंय. एमपीएससीने उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर अवघ्या दोनच तासामध्ये मेरिट लिस्ट लावण्याचा विक्रम केला आहे. एमपीएसचीच्या इतिहासातील हा सर्वात सुपरफास्ट निकाल असल्याचं सांगितलं जातंय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसिलदार अशा वर्ग 1 च्या पदांसाठी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला, 4,5 आणि 6 डिसेंबर रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या यादीत प्रमोद चौगुले राज्यात प्रथम आला आहे तर निलेश नेताजी कदम यानं दुसरा क्रमांक पटकावलं आहे. रुपाली माने हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
एकूण दोनशे पदांसाठी 597 उमेदवारांची या निकालाच्या माध्यमातून निवड करण्यात आलीय. या मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना आज मुलाखतींसाठी आयोगाकडून बोलावण्यात आले होते. या उमेदवारांच्या मुख्य परीक्षेतील गुणांची यादी लोकसेवा आयोगाकडून आधीच तयार ठेवण्यात आली होती. आज मुलाखती झाल्यानंतर मुलाखती घेणाऱ्या पॅनलकडून देण्यात आलेल्या गुणांची बेरीज मुख्य परीक्षेतील गुणांसोबत करण्यात आली आणि अवघ्या दोनच तासांमध्ये मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.
एमपीएसची आयोग आणि स्टाफ पुण्यात दाखल
आज सर्व मुलाखती या पुण्यामध्ये घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी एमपीएससीचा संपूर्ण आयोग, स्टाफ हा पुण्यामध्ये दाखल झाला आहे. एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर आणि पाच सदस्यांनी आजच्या मुलाखती घेतल्या.
हा निकाल अंतिम नाही
आज लावण्यात आलेली मेरिट लिस्ट म्हणजे अंतिम निकाल नाही. आजच्या मेरिट लिस्टमधील उमेदवारांकडून पदासाठीची प्राथमिकता मागवण्यात येणार आहे. मेरिट यादीतील उमेदवारांनी ही प्राथमिकता 9 मे पर्यंत द्यायची आहे. ती आल्यानंतर त्या प्राथमिकतेनुसार आणि प्रवर्गानुसार यातील 200 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 करीता पदांचे पसंतीक्रम सादर करणे व भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प निवडणे, याकरीता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कालावधी:- दिनांक 2 मे 2022 रोजी दुपरी 3 ते दिनांक 9 मे 2022 रोजी रात्री 11.59 पर्यंत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर परीक्षा उशीरा घेत असल्याबद्दल आणि परीक्षांचा निकाल उशीरा लावत असल्याबद्दल मागील काळात सातत्याने टीका करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आपली कार्यशैली बदलल्याचं दिसून आलं आहे.