(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Semi Conductor Project : वेदांता-फॉक्सकॉनवरुन 'ब्लेम गेम'! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
CM Eknath Shinde On Vedanta Foxconn : मुख्यमंत्र्यांकडून फॉक्सकॉन प्रकरणाचं खापर मविआच्या डोक्यावर, दोन वर्षात योग्य प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप, राज ठाकरेंकडून चौकशीची मागणी
CM Eknath Shinde On Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं आरोप-प्रत्यारोप सुरु असताना मुख्यमंत्री शिंदेंनी त्याचं खापर महाविकास आघाडीवर फोडलं आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारकडे बोट दाखवलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यासंदर्भात काल (मंगळवारी) शिंदे गटाची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्पाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संपूर्ण प्रकरणाचं खापर महाविकास आघाडीच्या माथी फोडलं. मुख्यमंत्री म्हणाले की, "आम्हाला तर दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता कंपनीच्या प्रमुखांशी माझी चर्चा झाली होती. सरकार त्यांना प्रकल्पासाठी जी काही मदत हवी ती देईल, असं बोलणं झालं होतं. त्यानंतर तळेगावमध्ये जवळपास अकराशे एकर जमीनदेखील आम्ही देऊ केली होती." पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, "पण गेल्या दोन वर्षांत वेदांता कंपनीला ज्याप्रकारे रिस्पॉन्स मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा. आता याबाबत केंद्र सरकार आणि अग्रवाल हे कंपनीच्या मालकांसोबत बातचीत करणार आहेत. तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करू."
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन मविआ आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप
वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आणि त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकीय रणकंदन सुरु झालं आहे. तब्बल एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखभर नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणारा सेमिकंडक्टर्सचा हा प्रकल्प अखेरच्या क्षणी गुजरातला मिळाला. त्यावरून काल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र याचं खापर महाविकास आघाडीवर फोडलं आहे. या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारनं प्रयत्न केले होते, असा दावा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. तर दोन वर्षांत कंपनीला योग्य प्रतिसाद मिळाला नसावा, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी मविआ सरकारकडेच बोट दाखवलं. या प्रकल्पावरून राजकीय चिखलफेक सुरु असली तरी मोठा प्रकल्प महाराष्ट्रानं कुणामुळे गमावला याची चर्चा महाराष्ट्रात सुरु आहे.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात फोनवरुन चर्चा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काल फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्यानं शिंदे-फडणवीस सरकारवर मविआनं जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यातील चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. फॉक्सकॉनचा प्रकल्प गेल्यामुळे महाराष्ट्रानं 1 लाख कोटीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची मोठी संधी गमवली आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना काय आश्वासन दिलंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Raj Thackeray On Vedanta Foxconn: फॉक्सकॉन प्रकरणाची सखोल चौकशी करा, राज ठाकरे यांची मागणी
- Semi Conductor Project : महाराष्ट्रात येणारा उद्योग गुजरातमध्ये कसा? आदित्य ठाकरेंच्या ट्वीटने चर्चांना उधाण