(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Budget 2022: सापाच्या पिल्लाला 30 वर्षे दूध पाजलं, आता ते फुत्कारतंय; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका
Maharashtra Budget 2022: महाविकास आघाडी सरकार भक्कम असून ते पाडून दाखवा असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे.
मुंबई: सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता वळवळ करत आमच्यावरच फुत्कारत आहे अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता केली आहे. सरकार पडणार म्हणतात, माझे 170 मोहरे आहेत, ते फोडून दाखवा असंही आवाहन त्यांनी भाजपला दिलं आहे. गुरुवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
आजच्या या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शिवसेनेचे प्रमुख नेते तसेच आमदार उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "सध्या देशात एक विकृती आहे, एक घृणास्पद राजकारण सुरू आहे. आज इकडे धाड पाडतायत, तिकडे धाड पाडतायत, याला अटक करतायत, त्याला अटक करतायेत. मात्र आता हे खपवून घ्यायचं नाही. केंद्र सरकारच्या कोणत्याही दबावासमोर झुकू नका."
महाविकास आघाडी भक्कम
उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजप नेते म्हणतात की महाविकास आघाडीचे सरकार पडणार. पण माझ्याकडे 170 मोहरे आहेत, त्यांना फोडून दाखवा. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्कारणार नाहीत. आपली एकजूट हीच आपली ताकद आहे."
दाऊदला शोधून दाखवा, उद्धव ठाकरेंचे आव्हान
आम्ही कोणावर वार करत नाही, पण कोणी वार केला तर आम्ही त्याला सोडणार नाही असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, "रोज कोणीही उठतोय आणि दाऊदवर बोलतो. हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाही? तिकडे पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग दाऊदच्या मुसक्या का आळवत नाही?"
दरम्यान, गुरुवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून त्या आगोदर आज चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला होता तर मुख्यमंत्री अनुपस्थित होते.
संबंधित बातम्या:
- Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजणार 'हे' महत्वाचे मुद्दे? विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत
- अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही, फडणवीसांचा टोला; चहापाण्यावर भाजपचा बहिष्कार
- Maharashtra Budget Session : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 9 मार्चला? उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन