Ashadhi Ekadashi 2022 : आषाढीसाठी 2 वर्षानंतर विठ्ठलाच्या लाडू प्रसादाची विक्री सुरु, लाडू बनविताना भाविकांच्या आरोग्याची ऐशीतैशी
Ashadhi Ekadashi 2022 : आषाढीसाठी 2 वर्षानंतर विठ्ठलाच्या लाडू प्रसादाची विक्री सुरु झाली आहे. पण लाडू बनविताना भाविकांच्या आरोग्याची ऐशीतैशी झाल्याचं लक्षात आलंय.

Ashadhi Ekadashi 2022 : गेले दोन वर्षं कोरोना (Corona) संकटामुळे बंद असलेला विठुरायाचा लाडू प्रसाद यंदा अनेक वादानंतर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. असं असलं तरी लाडू बनवताना घ्यायची काळजी मात्र घेतली जात नसल्यानं भाविकांच्या आरोग्याला याचा धोका निर्माण होऊ शकणार आहे. मंदिर समितीनं दिलेले लाडू प्रसादाच्या टेंडरनुसार सध्या सांगोला रोडवरील एका शेडमध्ये हे लाडू बनवण्याचं काम सुरु आहे. यंदा आषाढीसाठी 8 लाख लाडू बनवण्यात येणार आहेत. यासाठी आरोग्याच्या मानकानुसार, घ्यायच्या काळजीबाबत खबरदारी घेतली जात नसल्यानं याचा फटका भाविकांना बसणार आहे. हे लाडू बनविण्यासाठी अन्न आणि औषध निर्माण विभागाच्या नियमांनुसार, मंदिर समिती हे लाडू बनवण्याचा ठेका देत असते. इथे मात्र लाडू बनवताना किंवा लाडू बांधताना आवश्यक असणारे हातमोजे घालण्यात येत नसून मोकळ्या हातांनी बनवलेल्या लाडूंमुळे भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती आहे.
यंदा आषाढी वारीसाठी (Ashadhi Ekadashi 2022) लाडू प्रसादाची मोठी मागणी असणार आहे. तरी ऐनवेळी वेळेत लाडू बनवण्यासाठी नियमांची ऐशीतैशी केली जात आहे. याबाबत मंदिर प्रशासन देखील बेदखल असून लाडू विक्री केंद्रांचं उद्घाटन करण्यात प्रशासन अडकलं आहे. याबाबत जिल्हा प्रशासन आणि अन्न व औषध विभागानं तातडीनं तपासणी न केल्यास याचा फटका भाविकांच्या आरोग्याला बसण्याचा धोका आहे. सध्या या लाडू विक्री दारांत आधीच मंदिर समितीनं 2 लाडूंची किंमत 15 वरून 20 रुपये केल्यानं भाविकांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच लाडू प्रसाद बनविताना हायजेनिक काळजी घेतली जात नसल्यानं आता त्यांच्या आरोग्यालाही त्रास होण्याची भीती आहे.
गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूची विक्री करण्यास सुरुवात केली होती. वारकऱ्यांमध्ये हा लाडू प्रसाद खूपच लोकप्रिय झाला होता. आम्ही देवाच्या दर्शनाला आल्यावर गावाकडे जाताना प्रसाद म्हणून हा लाडू नेत असतो, असं वारकरी सांगतात. वर्षभरात साधारण 50 ते 55 लाख लाडूंची विक्री होऊन समितीला यातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत होतं. कोरोना काळात दोन हा लाडू प्रसाद समितीने बंद केला होता. मंदिर सुरु होऊनही लाडू प्रसाद मिळत नसल्यानं भाविकांची नाराजी होती. आता आषाढीपूर्वी लाडू देण्याची तयारी असून लाडू प्रसाद मात्र 20 रुपये होणार असल्याचं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे. खरंतर यावेळी लाडूचे वजन 140 ग्रॅम केल्याचं कारण देत किंमत वाढल्याचं औसेकर सांगत असले तरी पूर्वीचे लाडू देखील 140 ग्रॅम वजनाचेच होते आणि त्यांची किंमत 15 रुपये होती. पूर्वीचे ठेकेदार 140 ग्रॅम वजनाचे 2 लाडू पॅकिंग करुन 12 रुपये 50 पैसेनुसार मंदिर समितीला देत होते. आता त्याच वजनाच्या लाडूसाठी भाविकांचा मात्र खिसा कापला जाणार आहे. आता भाविकांचा खिसा कापून वाढलेली ही किंमत नेमकी कोणाच्या खिशात जाणार, ठेकेदार की मंदिर समिती हे पाहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
