Ashadhi Wari : ठरलं! आषाढीची महापूजा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार, मंदिर प्रशासनाची माहिती
Ashadhi Wari : विठ्ठलची महापुजा नव नियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती मंदिर समितीनं दिली आहे.
Ashadhi Wari 2022 : येत्या 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. दरवर्षी या आषाढी वारी निमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांचा मेळा भरत असतो. आषाढी वारीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा होत असते. यावेळी कोणाच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापुजा होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. पण अखेर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शपथ घेतली. त्यामुळं आता विठ्ठलची महापुजा नव नियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी एबीपी माझाला दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड काल राजभवनात पाहायला मिळाली. शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अनपेक्षित निर्णयाची घोषणा केली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. या घोषणेबरोबरच देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावरील यंदाची आषाढी वारीला होणारी विठ्ठलाची महापुजा कोण करणार हा संभ्रम देखील दूर केला होता.
अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून असलेला आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करुन पालख्या 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडे आहे. आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय पूजेचा मान हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी पूजा केली होती. मात्र, यंदाच्या पंढरपूरच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का? की देवेंद्र फडणवीस जाणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला. आता राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळं शासकीय महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेना मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या: