पुष्पक एक्सप्रेस दरोडा बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपी 48 तासात गजाआड
पुष्पक एक्सप्रेस दरोडा बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना 48 तासात गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. यातील दोघांनी प्रवासी महिलेवर बलात्कार केला होता.
कल्याण : पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकून एका महिलेवर बलात्कार प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी अवघ्या 48 तासात आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आठपैकी दोन दरोडेखोरांनी महिलेवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. हा दरोडा नियोजित नसला तरी आरोपी हे सराईत आणि गुन्हेगार मानसिकतेचे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
यामधील चार आरोपींना काल दुपारीच अटक करण्यात आली होती, त्यांना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 16 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर यामधील एका आरोपीला काल रात्री उशिराने अटक केली तर तीन आरोपींना आज सायंकाळच्या सुमारास अटक केली. अर्षद शेख, प्रकाश पारधी, अर्जुन परदेशी, किशोर सोनवणे, काशीनाथ उर्फ काश्या तेलंग, आकाश शेनोरे, धनंजय भगत उर्फ गुड्डू, राहुल आडोळे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
8 ऑक्टोबरच्या रात्री साडेसात वाजता लखनऊ सीएसटी पुष्पक एक्सप्रेसमध्ये डी टू या बोगीत आठ जणांनी दरोडा टाकला. आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल रोकड लूटली होती. मारहाणीत सहा प्रवासी जखमी झाले. हे दरोडेखोर इथेच थांबले नाही तर पतीसोबत प्रवास करणाऱ्या एका 20 वर्षीय महिलेवर दोन आरोपींनी बलात्कार केला. कसारा स्टेशनच्या आधी आरोपीपैकी एकाने गाडीची साखळी खेचली. याचवेळी गाडी स्लो झाल्याने तीन आरोपी पळून गेले. उर्वरीत पाचपैकी तीन आरोपी कसारा स्टेशन आल्यावर उतरले व निसटण्यात यशस्वी ठरले. उर्वरीत दोन आरोपींना प्रवाशांनी पकडून ठेवले. या दोन आरोपींना कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली त्यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली आणि तपास सुरु केला.
मध्य रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालीद, उपायुक्त मनोज पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शार्दूल, रेल्वे पोलिसांची तीन पथके आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्ह्यातील सर्व आरोपी अर्षद शेख, प्रकाश पारधी, अर्जुन परदेशी, किशोर सोनवणे, काशीनाथ उर्फ काश्या तेलंग, आकाश शेनोरे, धनंजय भगत उर्फ गुड्डू, राहुल आडोळे या आठही जणांना पोलिसांनी अवघ्या 48 तासात बेड्या ठोकल्या आहेत. आठपैकी सात आरोपी हे इगतपुरी येथील घोटी टाके येथील आहेत तर एक आरोपी मुंबईचा आहे. आकाश शेनोरे या सर्वांचा म्होरक्या आहे. सर्व आरोपींनी घोटी येथे मद्यपान केले. त्यानंतर इगतपूरी स्टेशन येथे मद्यपान केले त्यानंतर गांजा ओढला. नशापान करुन ते इगतपूरी येथे लखनऊ पुष्पक एक्सप्रेसमध्ये चढले. दरोड्याचे काही प्लॅनिंग केले नव्हते. सर्व आरेोपी हे गुन्हेगारी मानसिकतेचे आणि सराईत असल्याची माहिती समोर आली आहे.