Bhavana Gawali: ठाकरे गटाचे कार्यकर्ते माझ्या अंगावर आले, खासदार भावना गवळींचा आरोप; अकोल्यातील गोंधळावर तक्रार दाखल
अकोला रेल्वे स्टेशनवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या समोरासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी गवळींच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.
मुंबई: अकोल्याहून विदर्भ एक्स्प्रेसनं मुंबईच्या दिशेनं निघत असताना शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या अंगावर आले, असा आरोप शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आपल्याविरोधात घोषणाबाजी करण्यासाठी खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांनी चिथावलं असाही आरोप खासदार गवळी यांनी केला आहे.
यासंबधी बोलताना खासदार भावना गवळी म्हणाल्या की, अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी माझा अंगावर आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या कार्यकर्त्यांना आमदार नितीन देशमुख व विनायक राऊत यांनी चिथवलं. हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. हे कृत्य त्यांच्या कुटुंबियांबाबत झालं असतं तर चाललं असतं का? मी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी हे दोघंही मंगळवारी अकोल्याहून विदर्भ एक्स्प्रेसनं मुंबईच्या दिशेनं निघाले होते. त्यावेळी राऊतांना निरोप देण्यासाठी आमदार नितीन देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते अकोला स्थानकावर आले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना गवळींना पाहताच त्यांच्यासमोर 'गद्दार-गद्दार' अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर खासदार भावना गवळी ट्रेनच्या डब्याबाहेर आल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही उपस्थित होते. आमदार नितीन देशमुख यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी खासदार भावना गवळी यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याचं चित्रफितीत दिसत आहे.
खासदार भावना गवळी यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार केली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी कार्यकर्त्यांना चिथावल्याचं त्यांनी पोलिस तक्रारीत म्हटलं आहे. खासदार राऊत आणि आमदार देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही त्यांनी मागणी केली. मुख्यमंत्री, राज्य महिला आयोग, केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे आपण तक्रार करणार असल्याचंही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
आम्ही बाळासाहेबांचे नाव घेऊन लोकसभेत गेलो, आम्ही शिवसेना सोडली नाही, आम्ही आमचे विचार विकले नाहीत असं खासदार भावना गवळी म्हणाल्या. आदित्य ठाकरे यांना आपलं घर संभाळता आलं नाही, महाराष्ट्र संभाळता आलं नाही मग दुसरीकडे जाऊन काय होणार असा सवालही त्यांनी विचारला.
ही संबंधित बातमी वाचा: