(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
शिवसेनेकडून मुंबईसाठी 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये, हारुण खान यांनाही वर्सोव्यातून उमेदवारी देण्यात आली होती.
मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपात मुंबईतील जागांवरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठी ताणाताण पाहायला मिळाली. राज्यातील काही जागांसह मुंबईतील जागांवरूनही दोन्ही पक्षाचे प्रमुख एकमेकांविरुद्ध लढल्याचं पाहायला मिळालं. त्यात, वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील जागेवरही काँग्रेस आग्रही होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ती जागा शिवसेनेकडेच घेतली. त्यानंतर, येथील महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून हारुण खान यांना उमेदवारी जाहीर झाली. शिवसेना (Shivsena) शाखाप्रमुख राहिलेल्या खान यांना ही मोठी संधी होती. अखेर खान यांनीही या संधीचं सोनं करुन दाखवत वर्सोवा विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवला. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिल्याने ठाकरेंना लाभ झाल्याचं विश्लेषण अनेकजण करत होते. त्यातच, उद्धव ठाकरेंनी विधानसभेला हारुण खान यांना तिकीट देऊन पुन्हा एकदा मास्टरस्ट्रोक मारला होता.
शिवसेनेकडून मुंबईसाठी 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये, हारुण खान यांनाही वर्सोव्यातून उमेदवारी देण्यात आली होती. येथील मतदारसंघात त्यांना भाजप नेत्या भारती लव्हेकर यांचं आव्हान होतं. येथील अटीतटीच्या लढतीत वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हारुण खान विजयी झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील एकमेव मुस्लीम उमेदवार म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं, उद्धव ठाकरेंनी वर्सोवा मतदारसंघातून हारुण खान यांना तिकीट दिलं. खान यांनी येथील मतदारसंघात भाजपच्या महिला उमेदवार भारती लव्हेकर यांचा पराभव केलाय. येथील अटीतटीच्या लढाईत हारुण खान यांना 65,396 मतं मिळाली असून अवघ्या 1600 मतांनी त्यांचा विजय झाला आहे. तर, भारती लव्हेकर यांना 63,796 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, राज्यात महाविकास आघाडीचे 49 उमेदवार विजयी झाले असून त्यात शिवसेना ठाकरे गटाकडून विजयी झालेल हारुण खान हे एकमेव मुस्लीम उमेदवार आहेत.
मुंबईतील वर्सोवा येथील शिवसेना शाखा 64 चे शाखाप्रमुख म्हणून हारुण खान यांनी 15 वर्षे जबाबदारी सांभाळली. तसेच, शिवसेनेतील बंडानंतरही ते शिवसेना ठाकरे यांच्यासमवेतच राहिल्याने ठाकरेंकडून यंदाच्या विधानसभेत त्यांना उेमदवारी देण्यात आली आहे. पण, हारुण खान यांच्या उमेदवारीनंतर येथील मतदारसंघात इच्छुक असलेले राजू पेडणेकर आणि राजूल पटेल नाराज झाले होते. मात्र, हारुण खान यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंचा हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झालं आहे.
ठाकरेंच्या मुस्लीम उमेदवाराने फडकवला भगवा
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा पहिला मुस्लीम चेहरा हारुन खान यांच्या रुपाने देण्यात आला होता, जे आता आमदार बनल आहेत. हारुण खान हे गेल्या 15 वर्षांपासून शिवसेना शाखा 64 चे शाखाप्रमुख आहेत. तर, त्यांच्या पत्नी नगरसेवक राहिल्या आहेत, कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणूनही त्यांची जोगेश्वरी येथे ओळख आहे ठाकरेंनी त्यांना थेट विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर राज्यातील शिवसेना युबीटीचा पहिला मुस्लीम उमेदवार म्हणून ते विधानसभेत पोहोचले आहेत. कारण, शिवसेना युबीटी पक्षाकडून जाहीर झालेल्या 83 मतदारसंघातून हेच पहिले मुस्लीम उमेदवार आहेत.
हेही वाचा
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला