Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम भदाणे विरुद्ध काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात लढत झाली होती.
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम भदाणे विरुद्ध काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात लढत झाली होती. या मतदारसंघातून भाजपचे राम भदाणे हे तब्बल 66 हजार 320 मताधिक्यांनी विजयी झाले असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपने मुसंडी मारत विजय प्राप्त केला आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कुणाल पाटील यांच्या विरोधात भाजपचे राम भदाणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 32 वर्षीय राम भदाणे यांनी कुणाल पाटील यांचा दणदणीत पराभव करत तब्बल 66 हजार 320 मताधिक्यांनी विजय प्राप्त केला आहे. काल जाहीर झालेल्या निकालात राम भदाणे यांना एक लाख 70 हजार 398 मते मिळाली असून कुणाल पाटील यांना एक लाख 4 हजार 78 मतं मिळाली आहेत.
राम भदाणेंच्या विजयाची जोरदार चर्चा
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीने काँग्रेसचे कुणाल पाटील यांना तिसऱ्यांदा संधी दिली होती तर महायुतीने भाजपचे राम भदाणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख असलेले हिलाल माळी यांनी देखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली होती. राज्यात लाडकी बहीण योजनेचा झालेला प्रभाव या ठिकाणी देखील पाहायला मिळाला होता. धुळे जिल्ह्यात राम भदाणे यांच्या विजयाची चांगलीच चर्चा रंगली असून अवघ्या 32 वर्षीय राम भदाणे यांनी काँग्रेसच्या बालेकिल्लाला सुरुंग लावला आहे. 2009 साली शिवसेनेचे प्राध्यापक शरद पाटील यांनी माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव केल्यानंतर आता तब्बल पंधरा वर्षानंतर भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्लात कुणाल पाटलांचा पराभव केलाय.
आणखी वाचा
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप