भावना गवळींविरोधात घोषणाबाजी, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांसह आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल
Akola News Update : अकोला रेल्वे स्थानकावर काल शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली होती.
अकोला : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि आमदार नितिन देशमुखांसह ( Nitin Deshmukh) इतर काही जणांवर अकोल्याच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काल अकोला रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी ( Bhavna Gawli ) यांच्या विरोधात 'गद्दार-गद्दार' अशी जोरदार घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यावर आज रात्री उशीरा अकोला जीआरपी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, जमाव जमवणे, एकत्रित येऊन घोषणाबाजी करणे, अश्लील भाषेत बोलणे अशा कलमांतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत.
काल अकोला रेल्वे स्थानकावर झाला होता 'राडा'
अकोला रेल्वे स्थानकावर काल शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली होती. विदर्भ एक्सप्रेसने दोन्ही खासदार मूंबईकडे निघतांना दोघेही अकोला रेल्वे स्थानकावर समोरा-समोर आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भावना गवळींसमोर 'गद्दार-गद्दार' अशी घोषणाबाजी केलीय. भावना गवळी डब्याच्या बाहेर आल्यानंतरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. यावेळी खासदार गवळी बसलेल्या डब्याच्या खिडकीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुक्क्या मारल्याचंही समोर आलं होतं.
अकोला पोलिस अधिक्षकांकडे तक्रार
खासदार भावना गवळी यांनी अकोला लोहमार्ग पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खासदार विनायक राऊत आणि बाळापूर विधानसभा आमदार नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे काल माझ्याविरुद्ध अकोला रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी झाली, असा आरोप खासदार भावना गवळींनी तक्रारीत केला होता. काल अकोला रेल्वे स्थानकावर घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचं भावना गवळी यांनी म्हटलं आहे.
भावना गवळींच्या तक्रारीतील नऊ जणांमध्ये खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहरप्रमुख अतूल पवनीकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, राम गावंडे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख राहूल कराळे, गजानन बोराळे, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप गुरूखुद्दे यांच्यासह अज्ञात कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
रेल्वे स्थानकावर अनुपस्थित प्रदीप गुरूखुद्देंचं गवळींच्या तक्रारीत नाव
याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रदीप गुरूखुद्देंचं नाव आहे. याप्रकरणात खासदार भावना गवळींच्या तक्रारीत नवव्या क्रमांकावर त्यांचं नाव होतं. काल रेल्वे स्थानकावर हा प्रकार झाला तेव्हा प्रदीप गुरूखुद्दे आपल्या एका कौटूंबिक कार्यक्रमात कुटूंबियांसह उपस्थित असल्याचं त्यांनी 'एबीपी माझा'ला सांगितलं आहे.
दरम्यान गुन्हे दाखल झाल्यानंतर आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी या संदर्भात बोलायला नकार दिला आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहोत, त्यामध्ये सर्व मुद्द्यांवर बोलू असं देशमुख म्हणाले.