(Source: ECI/ABP News/ABP Majha)
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ''जनतेच्या जनादेशामधून हे स्पष्ट झालंय, की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचाच आहे.
नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानसभा निवडणुका लढवणार अशी घोषणा केलेल्या जरांगे पाटील यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. तसेच, तुम्हाला ज्याला निवडून द्यायचंय ते द्या, ज्याला पाडायचंय ते पाडा अशा शब्दात मराठा समाजाला आवाहन केलं होतं. तसेच, आपणही कुणाच्या प्रचाराला जात नाही, किंवा कोणाला पाठिंबा जाहीर केला नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, निवडणूक प्रचाराची मुदत संपत असताना त्यांनी येवल्यात जाऊन सांत्वन दौरा केला होता. या दौऱ्यावेळी मराठा समाज (Maratha) बांधवांशी बोलताना त्यांनी इथं दोघांना पाडा असं आवाहन केलं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत येथून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ विजयी झाले आहेत. त्यामुळे, आपल्या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी थेट मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं नाव घेऊन टोला लगावला.
छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ''जनतेच्या जनादेशामधून हे स्पष्ट झालंय, की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचाच आहे. कायद्याच्या दृष्टीनेही हा प्रश्न सुटला असून निवडणुकांत निवडून आलेल्या आमदारांच्या कौलमुळे राष्ट्रवादीबाबत आता लोकांमध्ये संभ्रम राहिलेला नाही,'' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं.
''शरद पवार साहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली, अभ्यास करुन त्यांनी माझ्याविरुद्ध उमेदवार दिला. आमचे मित्र जरांगे, त्याचं काय काम होतं, त्यांनी तर सांगितलं होतं की निवडणुकीमध्ये मी पडणार नाही, बोलणार. पण, प्रचार संपण्याच्या आदल्यादिवशी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत हाताला सलाईन आणि मी पाहा आजारी आहे. आता, माझं काहीही होईल, आपल्या समाजाची जी लेकरं बाळं आहेत, काहीतरी करा, ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा, असं सगळं सांगितलं. माझ्या मताधिक्यावर त्याचा परिणाम झाला, निश्चितच परिणा झाला. परंतु, इतरचा अल्पसंख्याक समाज एकत्र आला आणि त्यांनी आमचं तारु किनाऱ्याला लावलं,'' अशा शब्दात छगन भुजबळ यांना विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना थेट नाव घेऊन मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला. मराठा समाजानेही महायुतीला जरांगे सातत्याने सांगत होते, भुजबळ आणि फडणवीस यांच्याविरुद्ध, यांना पाडा असं सांगितलं. पण ते अजिबात चाललं नाही, लोकांनी देवेंद्र फणवीसांच्या नेतृत्वात 132 मेजॉरिटीने भाजपला निवडून दिलं, असेही भुजबळ यांनी म्हटलं.
हेही वाचा
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?