Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Manoj Jaranage on Devendra Fadnavis : महायुतीच्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा रंगलेल्या असतानाच मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय.
जालना : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप (BJP) हा पहिला पक्ष ठरला आहे. महायुतीच्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर भाजप सर्वाधिक जागांवर विजयी झाल्याने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली आहे. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर देखील मनोज जरांगेंनी नाव न घेता टीका केलीय.
मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही मैदानात नव्हतो, तुला जरांगे आणि मराठा फॅक्टर कळायला हयात जाईल. आयुष्य गेलं तरी हे जरांगे काय रसायन आहे हे कळणार नाही. मर्दासारखं बोलायचं, आपण ज्याच्या सभा घेतल्या तो निवडून आला पाहिजे. मराठ्यांचे दीडशे होते, आता 204 झालेत. मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. काहींना कुत्र्याचं कातडं पांघरून वाघ झाल्यासारखं वाटतं. मी मराठा बंधनमुक्त केला होता. राजकारणाच्या दहशतीपासून मी मराठा समाजमुक्त केला, अशी टीका त्यांनी लक्ष हाके यांच्यावर केली आहे.
...तर पुन्हा आमरण उपोषण होणार
मराठा समाज भाजपकडे वळला का? असे विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, मी समाजाला सांगितलं होतं, ज्याला निवडून आणायचं ज्याला पाडायचं त्याला पाडा. आमच्या मागन्या मान्य करायच्या नाहीतर सामूहिक उपोषण होणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचे काम करायचं नाही. राज्यात अर्धी गावं आमची आहेत. तुमच्या मागणी मान्य करायच्या, आमच्याशी बेईमानी करायची नाही. मराठ्यांना खेळवायचे आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न करायचा नाही. एका जातीवर उमेदवार उभे करून मला माझी जात संपवायची नव्हती. गोड बोलून मराठ्यांचं मतदान घेतला असेल. माज मस्ती आली मराठ्यांशी बेईमानी केली तर पुन्हा आमरण उपोषण होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार
राजेश टोपे यांच्या पराभवाबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हार जीत होत असते, सगळ्या दुनियेत होत असते, सगळ्याच राज्यात असे झाले आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच राज्यात मराठ्यांचा नाद करू नये, मराठ्यांनी शेवटी 204 आणले. सरकार स्थापन झाले की, आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत. आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही. तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय.
आणखी वाचा