शहाजी बापू पाटलांच्या आमदार निवासातील रुमचे छत कोसळलं, पण काळजी नको... बापू एकदम 'ओक्के'मध्ये
Shahaji Patil : रुमचं छत कोसळलं त्यावेळी आपण रुममध्ये नव्हतो, एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये होते असं शहाजी बापू म्हणाले.
मुंबई: काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल या आपल्या डॉयलॉगने घराघरात पोहोचलेल्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार निवासातील रुमचे सिलिंग कोसळलं. पण यामध्ये आपल्याला काही झालं नसून आपण एकदम सुरक्षित असल्याचं शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं. सतत पडत असलेल्या पावसामुळे या रुमच्या छताचा काही भाग कोसळल्याची माहिती आहे.
आपल्या रुमचे छत कोसळलं, त्यावेळी आपण एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये होतो असं शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "ही घटना बुधवारी घडली असून आपल्याला काही झालं नाही, आपण एकदम सुरक्षित आहोत. हे छत कोसळल्यानंतर आपण या रुपची चावी तिथल्या कर्मचाऱ्याला दिली आणि दुसऱ्या रुममध्ये राहिलो. त्यानंतर आज आपण सांगोल्यामध्ये पोहोचलो. काळजी करण्याचं काही कारण नाही."
शहाजी बापूंचं जल्लोषात स्वागत
शिवसेना बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचे सांगोला तालुक्यात गावोगावी अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावानंतर ते पहिल्यांदाच त्यांचा मतदारसंघ असलेल्या सांगोल्यात गेले. त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हलगीची कडकडाट आणि फटाक्यांच्या आतषबाजी करून बापूंचे स्वागत झाले. अनेक ठिकाणी त्यांचे फुलांच्या पायघड्या घालून आणि सुवासिनींकडून ओवाळून स्वागत झाले. यावेळी बापूंच्या पत्नीने ओवाळल्यावर बापूंचे डोळे पाणावले. याच पत्र्याच्या घरात बसून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायच्या चर्चा झाल्या, ते साध्य झाल्याचं त्यांनी सांगितले
मंत्रिपदाबाबत आमच्या सर्व आमदारांचे ठरले असून साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल अशी प्रतिक्रिया शहाजीबापू यांनी दिली. शरद पवार काही म्हणाले तरी काही होत नसते, 15 वर्षे हेच सरकार राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, एकीकडे शिवसेनेमध्ये उभी फूट पडून बंडखोर आमदार गुवाहाटीला गेले असताना दुसरीकडे 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल... एकदम ओक्के हाय' या डॉयलॉगमुळे शहाजी बापू चर्चेत आले होते.