''मी कालच 6000 कोटींच्या फाईलवर सही केली, आज तुमच्या भेटीला आलो''; लाडक्या बहिणींना अजित पवारांचा शब्द
राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या राज्यात जोरदार चर्चेत आणि आकर्षित ठरली आहे. राज्यभरातून या योजनेसाठी तब्बल सव्वा कोटी महिला भगिनींनी अर्ज केले आहेत.

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली असून राष्ट्रवादी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या दौऱ्यात महिला व शेतकरी बांधवांना उद्देशून ते भाषण करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Nashik) येथून अजित पवारांच्या यात्रेला सुरुवात झाली असून येथे हजारो महिलांनी त्यांचे स्वागत केले. राज्यात सध्या चर्चेत असलेल्या लाडक्या बहीण योजनेमुळे (Ladki bahin yojana) महिलांकडून अजित पवारांना धन्यवाद दिले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी दिंडोरीतील भाषणातून लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे. तुम्ही आमचं महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी आशीर्वाद द्या, पुढील 5 वर्षे ही योजना चालेल हा अजित दादाचा वादा आहे, असा शब्द अजित पवारांनी महिला भगिंनींना (Women) दिला आहे.
राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या राज्यात जोरदार चर्चेत आणि आकर्षित ठरली आहे. राज्यभरातून या योजनेसाठी तब्बल सव्वा कोटी महिला भगिनींनी अर्ज केले आहेत. राज्य सरकारकडून रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे 3000 रुपये देण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा हफ्ता म्हणून 3000 रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिंडोरीतील भाषणातून याबाबत माहिती दिली.
कालच 6000 कोटींच्या फाईलवर सही केली
माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही तुमच्यासाठी दिली आहे. गावागावात, पाड्यावर, वाडीवस्तीवर सगळीकडं माहिती झालीय की, अशी योजना आलीय. गावाकडं आई स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन आपल्या लेकरांसाठी काहीतरी करते. पण, तिलाही वाटत असेल कुठतरी जत्रेत जावं, काहीतरी घ्यावं. महिलांच्या या आशा, अपेक्षांसाठी आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणली. आया बहिणींनो, माय माऊलींनो, तुमचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही हा अजित दादांचा वादा आहे. माझ्या माय माऊलीच्या पाठीशी मी आहे. कालच, मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आज तुम्हाला भेटायला आलोय, असे अजित पवार यांनी म्हटले.
...तर 5 वर्षांसाठी ही योजना चालेल
माझी विनंती आहे, ते पैसे तुमच्या स्वत:साठी खर्च करा, वर्षभरासाठी 46000 कोटी रुपये आपण खर्च करत आहोत. विरोधकांकडून टीका केली जातेय की हा चुनावी जुमला आहे, पण माय माऊलींनो मी तुम्हाला सांगतो, हे तात्पुरतं नाही. तुम्ही महायुती सरकारला पुन्हा आशीर्वाद द्या. पुढील 5 वर्षे ही योजना चालेल हा अजित दादाचा वादा आहे, असे म्हणत पुढील 5 वर्षे ही योजना चालेल असा शब्दच अजित पवारांनी यात्रेच्या पहिल्याच दिवशी राज्यातील महिलांना दिला.
हेही वाचा
मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते 17 ऑगस्टला जमा होणार, 3 हजार रुपये खात्यात येणार!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
