Agriculture News : सरकारकडून तांदळाला बोनस जाहीर, मात्र प्रतिक्विंटल मागे आर्थिक लूट; वाचा नेमकं काय आहे गणित...
राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनात तांदळाला (धान) (Rice) प्रती हेक्टरी 15 हजार रुपयांचा बोनस (Bonus) जाहीर केला आहे. मात्र, याचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Agriculture News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session Nagpur) तांदळाला (धान) (Rice) प्रती हेक्टरी 15 हजार रुपयांचा बोनस (Bonus) जाहीर केला आहे. यात दोन हेक्टरपेक्षा अधिक शेती असणाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र, राज्य सरकारची बोनसची ही घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची (Farmers) शुद्ध फसवणूक असल्याची ओरड शेतकरी करत आहेत. सरकारनं हेक्टरी 15 हजारांची घोषणा केली असल्यानं हा आकडा मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात लाभ मात्र प्रतिक्विंटल मागे 300 रुपयांपर्यंतचा मिळणार आहे. त्यामुळं मागील सरकारच्या तुलनेत ही घोषणा गाजर दाखवण्याचा प्रकार आसल्याचं बोललं जात आहे.
प्रति क्विंटल शेतकऱ्यांना केवळ 300 रुपये मिळणार
महाविकास आघाडी सरकारनं प्रती क्विंटल 700 रुपयांचा बोनस आणि 50 क्विंटलची मर्यादा दिली होती. तर, दोन हेक्टरला 35 हजारांचा बोनस दिला होता. मात्र, या सरकारने प्रती हेक्टरी 15 हजार याप्रमाणे दोन हेक्टरला 30 हजार बोनस जाहीर केला आहे. त्यामुळं शेतकऱ्याचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रति क्विंटल आणि एक हेक्टर यांचा ताळमेळ जुळवल्यास शेतकऱ्यांना 300 रुपयांचा बोनस मिळणार आहेत. त्यामुळं मविआ सरकारने दिलेल्या बोनस पेक्षाही 400 रुपये बोनस शेतकऱ्यांना कमी मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सरकारनं घोषित केलेला बोनस म्हणजे शेतकऱ्यांचीचं आर्थिक लूट
सरकारनं तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजारांची घोषणा केली आहे. यावरुन विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारनं घोषित केलेला बोनस म्हणजे, शेतकऱ्यांचीचं आर्थिक लूट असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, राज्यकर्ते ही घोषणा म्हणजे आजपर्यंतचा सर्वाधिक बोनस असल्याचे म्हणत आहेत.
शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या गाव नमुना आठ नुसार बोनसचे वितरण होणार की, प्रत्यक्ष आधारभूत तांदूळ खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या एकूण क्विंटलनुसार बोनस मिळणार याचा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. अगोदरच मेटाकुटीस आलेल्या बळीराजाची आर्थिक परिस्थिती सुधारणार का? हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: