Pune News : थेरगाव क्वीननंतर हडपसरच्या “बादशाह”ला रिल्स बनवणं पडलं महागात; रिल्समधून पोलिसांना दिलं आव्हान अन् मग पोलिसांनी थेट...
रिलच्या नादात पुण्यातील एकाला पोलीस स्टेशनच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. पुण्याच्या हडपसरमधून एक तरुण थेट गुन्हेगारीचे उदातीकरण करत थेट पोलिसांनी आव्हान देत असल्याचे समोर आले आहे.
पुणे : सध्या रिलचा जमाना आहे. सगळे तरुण मंडळी रिल्स करुन (reels) फेमस होण्याचं (Pune Crime News) स्वप्न पाहत कोणत्यातरी विषयावर रिल्स करुन स्टार होतात. मात्र याच रिलच्या नादात पुण्यातील एकाला पोलीस स्टेशनच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. पुण्याच्या हडपसरमधून एक तरुण थेट गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत थेट पोलिसांनी आव्हान देत असल्याचे समोर आले आहे. मात्र, व्हिडीओ व्हायरल होताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या तरुणाकडून एका व्हिडीओतूनच माफीनामा तयार करून घेतला आहे.
पवन संतोष भारती (वय 20, रा. तरवडे वस्ती, मोहम्मदवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने थेट सोशल मीडियावर रील्स बनवलं होतं. त्या रिल्समध्ये 'हे हडपसर गाव आहे, इथे दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते' असं म्हटलं होतं. त्याने बादशाह नावाचे रिल्स बनवून थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते. हेच रिल्स पाहून पुणे पोलिसांनी त्याला गाठलं आणि त्याला थेट पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावली.
हडपसर येथील इंडस्ट्रियल एरियातील शिंदेवस्ती येथे तरुण थांबला आहे, असं पोलिसांना कळलं होतं. त्यानुसार, पोलीसांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी कोयता सापडला. पोलीसांनी तरुणाचा अटक करून त्याच्याकडून माफीनामा घेतला आहे.
थेरगाव क्वीनदेखील गोत्यात सापडली होती...
काही दिवसांपूर्वी थेरगाव क्विनदेखील रिलमध्ये अशीच शिवीगाळ करत असल्यानं तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या लेडी डॉन थेरगाव क्विनला अटक करण्यात आली होती. ती फक्त 19 वर्षांची होती. इंग्राग्रामवर अश्लील शिवीगाळ करत व्हिडीओ पोस्ट करत होती. तिचे हेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर तिचा शोध घेत तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला अटक केली होती.
रिल्स स्टारची सोशल अरेरावी
सध्या सगळीकडेच रिल्स प्रचंड व्हायरल होत असतात. त्यात काही लोकांना लगेच प्रसिद्धी मिळते. त्यामुळे या प्रसिद्धीच्या मोहात अनेक लोक रिल्समध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यातच काही लोक फक्त शिवीगाळ करुन आणि अर्वाच्च भाषेतील रिल्स बनवून पोस्ट करुन व्हायरल होतात. मात्र आता याच रिल्स स्टारवर पोलिसांनी करडी नजर असल्याचं समोर आलं आहे. थेरगाव क्विननंतर पुण्याच्या बाहशाहला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ही बातमी वाचा-