'एबीपी नेटवर्क'चं बदलांचं नवं पाऊल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या लोगोचं अनावरण
आज सकाळी सात वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबीपी न्यूज नेटवर्कच्या नव्या लोगोचं, नव्या रुपाचं अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीने रिमोटचं बटन दाबून या लोगोचं अनावरण केलं.
मुंबई : बदल हा आपल्या जीवनातील एक सातत्यपूर्ण घटक आहे. मग तो अमुक एका कालावधीमध्ये झालेला असो किंवा अगदी एकाएकी झालेला असो. हाच बदल आपल्याला अशा एका विश्वात नेतो जे वेगळं आहे, अनपेक्षित आहे आणि तितकंच नवंही आहे. ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. यामुळं 'एबीपी' या ब्रँडची आणि त्याच्याशी संलग्न वाहिन्यांची ओळखच बदलली आहे. आज सकाळी सात वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबीपी न्यूज नेटवर्कच्या नव्या लोगोचं, नव्या रुपाचं अनावरण करण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीने रिमोटचं बटन दाबून या लोगोचं अनावरण केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वप्रथम मी एबीपी माझाचं अभिनंदन आणि कौतुक करतो. 14 व्या वर्षात आपण केवळ पाऊल टाकलेलं नाही तर दमदारपणे पाऊल टाकलंय. पूर्वी तुमच्या बाणाला चौकट होती. आता ती चौकट नसेल. अमर्याद या शब्दाला अर्थ आहे. मला खात्री आहे आपण या चौकटीतून मुक्त केलेल्या बाणाला योग्य ठिकाणी वापराल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
नव्या बदलांमध्ये सुटसुटीतपणा आणला आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे बदलांप्रमाणे काळाच्या ओघात वाहून जाऊ नका, एवढीच अपेक्षा. आपण मार्गदर्शक आहात. आपण निष्ठेने 13 वर्षापासून काम करत आहात, ते असंच पुढे सुरु राहिल अशी अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले.
यावेळी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, नवीन सुरुवातीपासून आतापर्यंत लोकांच्या अपेक्षा बदललेल्या आहेत. अमर्याद अशी थीम आहे. आपणही हीच थीम घेऊन काम करत आहोत. आपण आक्रमक झालो पण आक्रस्ताळेपणा टाळला. लोकांच्या हक्कांसाठी लढलो. चॅनल सुरु झाल्यापासून नंबर वन राहिलो. आता या नव्या बदलांसह लोकांच्या भल्यासाठी आपल्याला आणखी कसं मजबूतीनं उभा राहता येईल यावर लक्ष देऊ. समाजातील उपेक्षित घटकांना अधिकाधिक ताकत कशी देता येईल यावर लक्ष ठेवू. नव्या रुपाचं प्रेक्षक नक्की स्वागत करतील. चौकटीच्या पलीकडे जाण्याचा आपला प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.
एबीपी माझाची भूमिका
अमर्याद राहण्याच्या आमच्या या भूमिकेमुळं दर्शकांप्रती आमची जबाबदारी, दायित्व दाखवून देते. शिवाय वैचारिक दृष्टीकोन विस्तारत आपल्याल कल्पना आणि विश्वासाकडे पाहण्याचा एक मार्ग आम्ही या प्रयत्नांतून देऊ इच्छितो. भारत हा एक असा देश आहे जेथे अमर्याद कौशल्य आणि क्षमता आहे. पण, अंशिक आणि काही मर्यादित माहितीमुळं मात्र भ्रमाच्या भींती उभ्या राहिल्या आहेत. ज्यामुळं बौद्धित बंधनं समोर येऊन खऱ्या कौशल्याला वाव देता येत नाही.
हा बदल अखंड असेल आणि जगाकडे पाहण्याचा एक विस्तीर्ण दृष्टीकोन लाभेल. मोकळ्या मनानं विचार करण्याची एक अतिशय उत्तम आणि तितकाच भीतीदायक बाब म्हणजे तुमच्या बाबतीतील असुरक्षितता. पण, ABP Network नं कायमच धोका पत्करत माध्यम क्षेत्रातील बदलांना समजून घेतलं आहे. सातत्यानं बदलणाऱ्या 'कंझम्पशन मॉडेल'च्या दृष्टीनं आमच्या ब्रँडमध्ये काही उल्लेखनीय सुधारणा करण्यात आल्या आहेत.
ABP Networkची नवी ओळख असणार आहे या ब्रँडचा नवा लोगो. अर्थात एक अशी ओळख ज्या माध्यमातून आमचा दृष्टीकोन, ध्येय्य आणि समाजाला अविरतपणे माहिती पुरवण्याचा आमचा अट्टहास सर्वांपर्यंत अधिक प्रभावी आणि प्रत्यय़कारीपणे पोहोचणार आहे. ज्या माध्यमातून अतिशय तंतोतंत आणि विश्वासार्ह माहिती दर्शकांपर्यंत पोहोचणार आहे. ABP Networkनं कायमच युजर्स फर्स्ट या तत्वावर विश्वास ठेवला आहे. या बदलाच्या निमित्तानं एकंदर अनुभवच बदलेल असं नाही, तर नागरिकांसमवेत नागरिकांसाठीच असणाऱ्या या संस्थेचं नातं आणखी दृढ होणार आहे.